गोंदिया जिल्ह्याचे पालकत्व लातूरच्या नेतृत्वाखाली; बाबासाहेब पाटील नवे पालकमंत्री

12

गोंदिया, २१ जानेवारी २०२५ : विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री शपथविधी सोहळा, त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप आणि आता पालकमंत्रिपद अशा सर्वच वेळी महायुतीत तिढा निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे. आपल्यालाच पालकमंत्रिपद मिळावं यासाठी शर्यत होती. विधानसभेच्या निकालानंतर जवळपास दोन महिन्यांनी सर्व जिल्ह्यांची पालकमंत्रिपदं जाहीर झाली. पालकमंत्री पद हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. पालकमंत्रिपद हे एखाद्या जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. शासकीय आणि राजकीय अशा दोन्ही दृष्टीने या पदावरील व्यक्तीकडे येणारे अधिकार जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचे ठरतात. जबाबदारी दिलेल्या जिल्ह्याच्या विकासावर देखरेख ठेवण्याचं काम पालकमंत्र्याचं असतं. यामुळे पालकमंत्रीपद मिळावं यासाठी रस्सीखेच सुरु असते.

जाहीर झालेल्या पालकमंत्र्यांच्या यादी मध्ये अनेक जिल्ह्यांना बाहेरचा पालकमंत्री मिळाला आहे. या सगळ्या मध्ये चर्चा होत आहे ती गोंदिया जिल्ह्याची. याच कारण म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आले तरी देखील राज्य मंत्रिमंडळात गोंदिया जिल्ह्याला स्थान मिळाले नाही. सलग तीन वेळा निवडून आलेले भाजपचे आमदार विजय रहांगडाले किंवा माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजकुमार बडोले यापैकी एकाची तरी मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशी अपेक्षा जिल्हावासीयांना होती. पण, तसे झाले नाही.

जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान तर मिळालंच नाही याशिवाय पालकमंत्री देखील दुसऱ्या जिल्ह्याचे लाभले. नवे पालकमंत्री हे लातूर जिल्ह्यातील असून तिथून ते आता गोंदिया जिल्ह्याचा कारभार पाहणार आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महादेवराव शिवणकर आणि राजकुमार बडोले यांच्या व्यतिरिक्त आतापर्यंत जिल्ह्याला जिल्ह्याबाहेरील पालकमंत्री मिळाले आहेत. याशिवाय चार वर्षांत सहा पालकमंत्री मिळाल्याचा इतिहासही गोंदिया जिल्ह्याच्या नावावर आहे. जिल्ह्याला आतापर्यंत अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय बनसोडे, प्राजक्त तनपुरे, धर्मरावबाबा आत्राम हे परजिल्ह्यातील पालकमंत्री मिळाले होती आणि यावेळी देखील ही पंरपरा कायम राहिलीय.

गोंदिया जिल्ह्याचे नवे पालकमंत्री आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर मतदारसंघाचे आमदार आहेत. पालकमंत्री हे इतर जिल्ह्यातील असल्यामुळे त्यांना स्थानिक लोकांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्यासोबतच जिल्हावासीयांचा विश्वास संपादन करण्याचं आव्हान असणार आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : रुचिता घोसाळकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा