गुडन्यूज गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची नियमावली ठरली

मुंबई, दि. ४ ऑगस्ट २०२०: गेले अनेक दिवस कोकणवासीयांना सतावत असलेली चिंता आता दूर झाली आहे. गणेशोत्सवासाठी राज्य सरकारने याआधीच नियमावली जाहीर केली होती. मात्र कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आणखीन कोणते नियम लागू होतील याबाबत साशंकता होती. ती आता सरकारनं दूर केली आहे.

गणोशोत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी राज्यभरातून अनेक चाकरमानी हे आपापल्या गावी म्हणजेच कोकणात मोठ्या संख्येने जात असतात. मात्र यंदाच्या कोरोना महामारीनं सगळ्याच सण – उत्सवांवर अनेक मर्यादा आणल्या आहेत. गणेशोत्सवही यंदाच्या वर्षी अनेक नियम आणि अटी पाळून अगदी साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारनं केलंय. मात्र गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे काय? हा मोठा प्रश्न पडला होता. आता याचं उत्तर मिळालं असून राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबद्दल ट्विट करत माहिती दिली आहे.

कोकणात जाणाऱ्याला १४ दिवसांऐवजी केवळ १० दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. त्याचप्रमाणे एसटीने प्रवास करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा ई – पास काढण्याची आवश्यकता नसल्याचं अनिल परब यांनी सांगितलं. तसेच शारीरिक अंतर राखण्यासाठी एका बसमध्ये एकूण क्षमतेच्या केवळ  ५०% प्रवासी बसू शकतील. म्हणजे एका बसमध्ये साधारणतः २२ प्रवासी असतील. राज्य सरकारनं गणेशभक्तांसाठी ३००० बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २२ जणांनी मिळून एका एसटीचे ग्रुप बुकिंग केल्यास त्यांना थेट त्यांच्या गावात सोडले जाईल. एसटीने प्रवास करणाऱ्यांना एसटीतच जेवण करावे लागणार आहे. १२ ऑगस्ट नंतर कोकणात जाणाऱ्या प्रत्येकाला स्वॅब टेस्ट बंधनकारक असणार आहे.

खासगी बसचालक जादा दराने तिकीट विक्री करत आहेत. त्यावरही नियंत्रण आणले असल्याचे परब यांनी सांगितले. एसटीच्या दीडपट अधिक भाडे खासगी बसचालक आकारू शकतात. त्याहून अधिक बसभाडे आकारल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा