मुंबई, २८ जुलै २०२० : कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे थैमान पसरलं होतं.मात्र अथक प्रयत्नानंतर आता केडीएमसीतील रुग्ण संख्या आटोक्यात आल्याचे चित्र दिसत आहे. दररोज ५०० च्यावर कोरोना रुग्ण सापडत असल्याने चिंतेमध्ये असणाऱ्या कल्याण डोंबिवलीकरांसाठी काहीशी दिलासादायक माहिती मिळाली आहे . केडीएमसी क्षेत्रात कोरोना रुग्ण दुपटीचा वेग हा १५ दिवसांवरून ३२ दिवसांवर आल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिली आहे. आणि कोरोनाचा आकडा सध्या स्थिर असल्याचेही आयुक्तांनी सांगितले आहे.
केडीएमसीमध्ये रुग्ण संख्येत अचानक कमालीची वाढ झाली होती त्यानंतर मात्र केडीएमसीने धारावी पॅटर्न वापरात आणला आणि लॉकडाऊन कडक करण्यात आलं. अगदी त्यानंतर नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई सुद्धा केली गेली. जुन ते जुलै या महिनाभरात केडीएमसीने जवळपास २ लाख इतकी दंडाची रक्कम वसूल केली. त्यामुळे केडीएमसीचा हा कडकपणा आज यशस्वी झाला.
एक महिन्यापूर्वी कल्याण डोंबिवलीमध्ये रुग्णांचा आकडा मर्यादित होता आणि चाचण्या सुद्धा संथ गतीने सुरू होत्या. मात्र जुलै महिन्यात रुग्ण संख्येत वाढ झाली आणि हा आकडा वाढून दिवसाला ४०० ते ६०० रुग्णांवर येऊन पोहचला. मात्र गेल्या दोन आठवड्यापासून हा आकडा ३०० ते ४०० वर पोहचला. परंतु, डिस्चार्ज होण्याची संख्याही ६७ टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. असे ही आयुक्तांनी सांगितले. माहिनाभरात कल्याण डोंबिवलीमध्ये टेस्टिंग करण्याची संख्या सुद्धा वाढल्याने रुग्ण दुपटीचा वेग हा कमी झाला आहे .
महानगरपालिकेचे आता स्वतःचे टेस्टिंग लॅब झाल्याने त्याला आज पासून सुरवात झाली आणि दिवसाला २ हजार ६०० जणाची टेस्ट केली जाणार असल्याचे ही आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी सांगितले. रुग्ण संख्येत घट झाल्याने नागरिकांमध्ये सुध्दा समधानाचं वातावरण निर्माण झालं आहे . नागरिकांच्या सहकार्यामुळे हे शक्य होऊ शकले असेही त्यांनी यावेळी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : राजश्री वाघमारे