कल्याण, दि. १५ जुलै २०२०: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची स्वत:ची पहिली कोविड १९ टेस्टिंग लॅब या आठवड्याभरात सुरू होणार आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि क्रशना डायग्नोस्टिक्सच्या संयुक्त विद्यमाने पीपीपी तत्वावर ही टेस्टिंग लॅब सुरु करण्यात येत आहे. या लॅबचा फायदा कल्याण, डोंबिवलीसह उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी आदी क्षेत्रालाही मिळणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.
या लॅबमध्ये दररोज ३ हजार चाचण्या करण्याची क्षमता असून यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री ही क्रशना डायग्नोस्टिक्सच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहे. नॅशनल एक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटोरीज या संस्थेची मान्यता मिळाल्यावर येत्या आठवड्याभरात ही लॅब कार्यान्वित होणार असल्याची माहिती खासदार डॉ. शिंदे यांनी दिली. यामुळे कल्याण, डोंबिवली, उल्हसनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी शहरांतील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर याचा फायदा होणार आहे. कोविड-१९ चाचण्यांच्या निकाल उपलब्ध होण्याचा कालावधी कमी होणार असून रुग्णांवर उपचार देखील लवकरात लवकर होण्यास मदत होईल.
कल्याण-डोंबिवलीसह शहरांमधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोकण्यासाठी कोविड-१९ च्या जास्तीत जास्त चाचण्या होण हे गरजेचं आहे आणि जर चाचण्यांचा निकाल लवकरात लवकर मिळाला तर संबंधित रुग्णाला वेळेत रुग्णालयात उपचार घेता येतील. याकरता कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात कोरोना चाचण्यांसाठीची लॅब सुरु करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. या प्रयत्नांना यश आले असून गौरीपाडा, कल्याण पश्चिम परिसातील त्रिमूर्ती पार्क येथील महापालिकेच्या वास्तूमध्ये लॅब उभारण्यात येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे