कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी, आता धावणार मुंबई कोल्हापूर वंदेभारत एक्सप्रेस

पुणे, १३ ऑगस्ट २०२३ : कोरोना काळात कोल्हापूर-मुंबई मार्गावर धावणारी सह्याद्री एक्स्प्रेस बंद झाली होती. ती अजूनही सुरू झालेली नाही. त्यामुळे कोल्हापूरकरांना फक्त महालक्ष्मी एक्स्प्रेसवरच अवलंबून राहावे लागत आहे. याचदरम्यान कोकण रेल्वेला जोडणाऱ्या कोल्हापूर -वैभववाडी रेल्वे मार्गालाही गती मिळाली आहे. ही आनंदाची बातमी आली असतानाच आता आणखीन एक मोठी आनंदाची बातमी कोल्हापूरकरांना मिळाली आहे.

भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरला वंदे भारत एक्सप्रेस मिळावी अशी मागणी केली होती. त्याला आता हिरवा कंदील मिळाला आहे. येत्या काही महिन्यात ही ट्रेन सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर राज्यातील पाचवी वंदे भारत एक्सप्रेस कोल्हापूरकरांना मिळणार असल्याने कोल्हापूर, सांगली आणि सातारकरांना आता जलद प्रवास करता येणार आहे.

भारतीय रेल्वेने सुरु केलेली वंदे भारत एक्स्प्रेस महाराष्ट्रातून सध्या चार मार्गावरुन धावत आहे. देशभरात अनेक मार्गावरुन ही गाडी धावत आहे. या गाडीची अल्पावधीतच लोकप्रियता वाढली आहे. राज्यात मुंबई- गांधीनगर दरम्यान पहिली वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाली होती. त्यानंतर मुंबई-पुणे-सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस सुरू आहे. आता लवकरच मुंबई-कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा