मुंबई, १३ ऑगस्ट २०२४ : बॉलीवूडपासून ते साऊथ चित्रपटांपर्यंत आपल्या अभिनय कौशल्याची ओळख निर्माण करणाऱ्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा आज ६० वा वाढदिवस आहे. ‘हवा हवाई’ या नावाने प्रसिद्ध असलेली ही अभिनेत्री आज भलेही आपल्यात नसेल, पण आजही तिचे चाहते तिला मनापासून आठवतात. त्याचबरोबर गुगलनेही श्रीदेवीच्या वाढदिवस स्मरणार्थ खास डूडल बनवून साजरा केला आहे. गुगलने मुंबईस्थित अतिथी कलाकार भूमिका मुखर्जीने साकारलेला श्रीदेवीचा रंगीत फोटो शेअर केला आहे.
श्रीदेवीने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी ‘कंधन करुणाई’ या तमिळ चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण केले. अभिनेत्रीने १९७८ मध्ये ‘सोलवा सावन’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अभिनेत्रीने हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी इंडस्ट्रीला एकापेक्षा एक सिनेमे दिले. अभिनेत्रीने सुमारे ३०० चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. ज्यामध्ये ‘मिस्टर इंडिया’, ‘खुदा गवाह’, ‘लाडला’ आणि ‘इंग्लिश विंग्लिश’ सारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे.
अगदी हॉलिवूड दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गनेही श्रीदेवीला त्याच्या ‘ज्युरासिक पार्क’ चित्रपटात भूमिकेची ऑफर दिली, पण अभिनेत्रीने ती नाकारली. श्रीदेवी यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित केले होते. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी श्रीदेवी यांचे निधन झाले. अभिनेत्री एका कार्यक्रमासाठी दुबईला गेली होती. जिथे हॉटेलमधील बाथटबमध्ये तीचा मृतदेह आढळून आला. श्रीदेवीच्या अकाली निधनाने इंडस्ट्रीसह तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. श्रीदेवीचा जन्म १३ ऑगस्ट १९६३ रोजी शिवकाशी, तमिळनाडू येथे झाला होता. श्रीदेवीचे पूर्ण नाव श्री अम्मा यंगर अय्यपन होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड