तुमच्या मुलाला गोवर, रुबेलाची लस दिली आहे का?
हे आजार लहान वाटले तरी त्यांचे परिणाम गंभीर होऊ शकतात. मुलांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांचे लसीकरण वेळेत करणे अत्यंत आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर, पुणे जिल्ह्यात गोवर व रुबेला या संसर्गजन्य आजारांपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाने विशेष लसीकरण मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम १५ ते ३० सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्ये राबवली जात आहे.
या मोहिमेत सुमारे ३२०० मुलांना गोवर-रुबेला लस मोफत दिली जाणार आहे. यासाठी आरोग्य विभागाने विशेष पथके तयार केली असून प्रत्येक पथकामध्ये डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचारी यांचा समावेश आहे. पथके शाळांमध्ये जाऊनच लसीकरणाची सुविधा देत असल्याने विद्यार्थ्यांना कोणतीही गैरसोय होणार नाही.
गोवर हा एक विषाणूजन्य आजार असून खोकला, सर्दी, ताप आणि अंगावर लाल पुरळ अशी लक्षणे दिसतात. हा आजार मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतो. म्हणूनच पालकांनी आपल्या मुलांचे लसीकरण करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
या लसीकरण मोहिमेला शाळा प्रशासनाने पूर्ण सहकार्य दर्शवले आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना निरोगी आणि सुरक्षित वातावरण मिळेल. पालकांनी या विशेष मोहिमेचा लाभ घेऊन आपल्या मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे












































