ट्रकला बनावट नंबरप्लेट लावून शासनाची फसवणूक

बारामती २९ जानेवारी २०२१ :दुसऱया ट्रकची नंबर प्लेट स्वतःच्या ट्रकला बसवत शासनाचा कर चुकवत फसवणूक केल्याप्रकरणी नानासाहेब सावता शिंदे (वय ३७, रा. फ्लॅट क्र. २०३, सुमनश्रुती बिल्डींग, रुपीनगर, फुरसुंगी, पुणे, मूळ रा. चिलवडी, ता. कर्जत, जि, नगर) यांच्या विरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस कर्मचारी अकबर कादीर शेख यांनी याबाबत फिर्याद दिली. दि. २६ रोजी सायंकाळी बारामती शहरात पोलिस पेट्रोलिंग दरम्यान ही घटना उघडकिस आली. पेट्रोलिंग करत असताना पोलिसांनी एक ट्रक पकडला. त्याच्यावर एमएच-४२, एमव्ही – ००१६ असा क्रमांक होता. ट्रक चालक किरण रामचंद्र खंडाळे (रा. केडगाव चौफुला, ता. दौंड) घाबरल्याने पोलिसांना संशय आला. त्यांनी सखोल चौकशी करत खात्रीसाठी हा ट्रक शहर पोलिस ठाण्यात आणला. ट्रकमालक नानासाहेब शिंदे यांना फोन करून कागदपत्रे हजर करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर बारामतीच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडेही या ट्रकच्या नोंदीसाठी पत्र व्यवहार करण्यात आला. ट्रकमालकाने कागदपत्रे आणली असता ताब्यात घेतलेल्या ट्रकचा मूळ खरा क्रमांक एमएच-१२ डीजी-२२१ असा असल्याचे दिसून आले. ३० नोव्हेंबर २०१३ पासून या वाहनाचा रस्ता कर भरलेला नाही. ७ मार्च २००७ पासून फिटनेस सर्टीफिकेट नाही. ट्रकला लावलेला क्रमांक हा शिंदे यांचा चुलत भाऊ संदीप कांतीलाल शिंदे यांच्या ट्रकचा असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. शासकिय कर न भरता खोट्या क्रमांकाच्या आधारे वाहन चालवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नानासाहेब शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा