नवी दिल्ली, २६ फेब्रुवरी २०२१: नेटफ्लिक्स-अमेझॉन सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म, फेसबुक-ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी आता भारत सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला कोणतीही आक्षेपार्ह सामग्री काढून टाकावी लागेल. तसेच, डिजिटल माध्यमांना इलेक्ट्रॉनिक मीडियाप्रमाणेच स्वतःचे नियमन करावे लागेल.
सोशल मीडियासाठी मार्गदर्शकतत्त्वे जाहीर
रविशंकर प्रसाद म्हणाले की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे भारतात व्यवसाय करण्यासाठी स्वागत आहे, सरकार टीकेसाठी तयार आहे. सोशल मीडियाच्या चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास त्याची तक्रार करण्यास देखील हक्क असला पाहिजे. सोशल मीडिया साठी जे मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आले आहेत ते येत्या ३ महिन्यात लागू करण्यात येणार आहे.
रविशंकर प्रसाद म्हणाले की, भारतात व्हॉट्सअॅपचे ५३ कोटी वापरकर्ते आहेत, फेसबुकचे वापरकर्ते ४० कोटींपेक्षा जास्त आहेत, ट्विटरचे एक कोटीहून अधिक वापरकर्ते आहेत. त्यांचा भारतात खूप वापर केला जातो, परंतु व्यक्त झालेल्या चिंतांवर कार्य करणे महत्वाचे आहे.
वापरकर्त्यांची पडताळणी आवश्यक
पत्रकार परिषदेत रविशंकर प्रसाद म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर टाकल्या जाणाऱ्या सामग्रीसंदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यास सांगितले होते. सूचनांच्या आधारे भारत सरकारने याबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. रविशंकर प्रसाद म्हणाले की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने वापरकर्त्यांची पडताळणी केली पाहिजे, आत्ता सरकार त्यात हस्तक्षेप करणार नाही, परंतु प्लॅटफॉर्मने ते स्वतः केले पाहिजे.
दरमहा अहवाल द्यावा लागेल
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी जाहीर केले की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अधिकारी तैनात करावे लागतील, २४ तासांत कोणतीही आक्षेपार्ह सामग्री काढून टाकावी लागेल. प्लॅटफॉर्मवर त्यांचे नोडल ऑफिसर, निवासी ग्रीव्हन अधिकारी तैनात करावे लागतील. याशिवाय दरमहा किती तक्रारींवर प्रक्रिया केली जाते यावर कारवाई करावी लागेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे