लस उत्पादनासाठी भारत सरकारकडं ८० हजार कोटी आहे? – सीरम’चा सरकारला सवाल

पुणे, २७ सप्टेंबर २०२०: कोरोना पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर लस शोधाचं काम भारतासह संपूर्ण जगात सुरू आहे. दरम्यान, भारतातील लसीच्या संशोधनात गुंतलेल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे मुख्य कार्यकारी अदार पूनावाला यांनी केंद्र सरकारला विचारलं की, येत्या एक वर्षात लोकांच्या लसीवर खर्च करण्यासाठी सरकारकडं ८० हजार कोटी रुपये आहेत का?

एसआयआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पूनावाला यांनी ट्विटरवर सरकारला प्रश्न विचारला की, ‘पुढच्या एका वर्षात भारत सरकारकडं ८०,००० कोटी रुपये असतील? कारण, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला भारतातील प्रत्येकासाठी लस खरेदी आणि वितरण करण्यासाठी एवढ्याच प्रमाणात रक्कम आवश्यक असंल. हे पुढील आव्हान आहे, ज्यास आपल्याला सामोरं जावं लागंल.’  या ट्विटला पूनावाला यांनी पंतप्रधान कार्यालयाला (पीएमओ) टॅग’ही केलंय.

त्यानंतर अदार पूनावाल यांनी आणखी एक ट्वीट केलं, ज्यात ते म्हणाले की, ‘मी हा प्रश्न विचारला कारण, आम्हाला भारत आणि परदेशात लसी उत्पादकांना योजना व मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. आमच्या देशाच्या गरजा भागविण्यासाठी आणि वितरण करण्याच्या दृष्टीने हे आवश्यक आहे.’

 

कोरोना संकटाच्या वेळी ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांच्या संयुक्त विद्यमानं सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’नं कोरोना लस तयार केली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक संस्था आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठात जी लस तयार केली जात आहे त्यात या कंपनीची भागीदारी आहे.

डिसेंबर पर्यंत ३० कोटी डोस तयार करण्याचा दावा

पुण्यातील मांजरी भागात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चा अत्याधुनिक प्रकल्प ५० एकरांवर पसरलेला आहे. येथे, एका मिनिटात ५०० लसांचे डोस तयार केले जातात, तर एका वर्षात १५० कोटी डोस तयार करता येतात.

यापूर्वी, ऑक्सफोर्ड विद्यापीठानं विकसित केलेल्या कोरोना लसीचा पहिला मानवी चाचणी डेटा प्रकाशित झाल्यानंतर, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पूनावाला यांनी दावा केलाय की, डिसेंबर अखेरीस ऑक्सफोर्ड लस कोविशिल्ड’चे ३०० दशलक्ष डोस आम्ही बनविण्यात यशस्वी होऊ.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा