शासकीय कामे दिवसाआड तर सार्वजनिक वाहतूक ५० टक्के कमी

मुंबई: राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने होत असून रुग्णांच्या संख्येत देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाचा अधिक जोमाने मुकाबला करण्यासाठी संसर्ग कमी करणे आवश्यक आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवले तर हे शक्य होणार आहे. यासाठी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले यामध्ये राज्यातील शासकीय कार्यालये एक दिवसाआड पद्धतीने रोज निम्मे कर्मचारी येतील, या हिशोबाने सुरु ठेवण्यात येतील. तसेच रेल्वे, एसटी बसेस, खाजगी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही ५० टक्के प्रवासी क्षमतेने चालवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईमध्ये बेस्ट बसेसमधील उभे राहणारे प्रवासी बंद करण्यात येतील. तसेच बसमध्ये प्रवाशांनी अंतर ठेवून बसावेत अशा सूचना प्रवाशांना देण्यात येतील. त्याचसोबत शहरामध्ये बसेसची संख्या वाढवण्यासाठी पर्यायी बसेसची व्यवस्था करण्यात येईल, असे बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील शासकीय कार्यालये एक दिवसाआड पद्धतीने रोज निम्मे कर्मचारी येतील या परिस्थितीत ज्या शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टी घ्यायची आहे, ते सुट्टी घेऊ शकतात. सुट्टी घेणाऱ्या कर्माचाऱ्यांना मेडिकल सर्टिफिकेट दाखवण्याची आवश्यकना नाही. मात्र आरोग्य, औषध, पोलीस अशा अत्यावश्यक सेवांना ही सूट नसणार असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा