गोल पोस्ट agralekh अग्रलेख गोविंददेव गिरींचे वादाला निमंत्रण

गोविंददेव गिरींचे वादाला निमंत्रण

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे रामदास स्वामी गुरू होते, की नाही, यावरून वाद सुरू आहेत. त्यात रामदासी आणि वारकरी पंथ यांच्यात विचारांची भिन्नता असली आणि भक्तीमार्गात वेगळेपणा असला, तरी अंतिम ध्येय ईश्वरप्राप्तीच आहे, असे वारंवार सांगितले जाते. वारकरी संप्रदाय हा अध्यात्मिक विचाराचा असला, तरी तो विद्रोही आहे. कर्मकांड त्याला मान्य नाही. संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकारामांपर्यंतच्या संतांची एक वेगळी परंपरा आहे आणि रामदास स्वामी यांची वेगळी.

त्यामुळे त्यांच्या रचना किंवा त्यांच्या भक्तीसंप्रदायावरून वाद होईल, असे बोलणे टाळायला हवे. असे असताना संत ज्ञानेश्वरांच्या आळंदीत राहून ज्ञानेश्वरीविषयी चुकीचे भाष्य करण्यामुळे गोविंददेव गिरी महाराजांनी वादाला निमंत्रण दिले आहे.पुण्यातील एका राष्ट्रीय चर्चासत्रात केलेल्या वक्तव्यामुळे स्वामी गोविंददेव गिरी महाराज पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित ‘ज्ञानोबा ते तुकोबा’ या तीन दिवसीय कार्यक्रमात बीजभाषण करताना स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी संतपरंपरेबाबत केलेली मांडणी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार संतपरंपरेत दासबोध हाच एकमेव स्वतंत्र ग्रंथ आहे, तर ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत ही भाष्ये आहेत. तसेच तुकाराम गाथा आणि नामदेव महाराजांच्या गाथा या संकलन स्वरूपातील असल्याने त्यांना स्वतंत्र ग्रंथ म्हणता येणार नाही, असे ते म्हणाले. गोविंददेव गिरी महाराज यांच्या या विधानानंतर वारकरी समाजात तीव्र नाराजी पसरली आहे. वारकरी परंपरा ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील समता, बंधुता आणि भक्तीभावाची मूळाधार मानली जाते. संत ज्ञानेश्वर माउली, संत एकनाथ आणि संत तुकाराम यांच्या कार्यातून महाराष्ट्र धर्माची वीण घट्ट विणली गेली. ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासी कळस’ ही परंपरेची शिकवण आजही भाविकांच्या ओठांवर आहे. अशा पार्श्वभूमीवर संतपरंपरेतील प्रमुख ग्रंथांविषयी वेगळी भूमिका मांडल्याने वारकरी संघटना अस्वस्थ झाल्या आहेत. त्यांच्या मते, संतपरंपरेच्या गाभ्यावरच प्रश्न उपस्थित केल्यासारखे हे वक्तव्य आहे. चर्चासत्रात महाराजांनी केलेल्या निरुपणामागे नेमका कोणता संदर्भ होता, याबाबत स्पष्टता नसली, तरी त्यांच्या विधानाने खळबळ उडाली आहे.

संतपरंपरेतील ग्रंथांचे स्वरूप, भाष्य आणि संकलन यांबाबतचा शास्त्रीय विचार असू शकतो, असे काहींचे मत असले, तरी वारकरी पंथातील अनेकांना हे भाष्य खटकले आहे. संत साहित्य हे केवळ ग्रंथरूप नसून ते लोकांच्या जीवनाशी जोडलेले आध्यात्मिक अधिष्ठान आहे. त्यामुळे संतांच्या ग्रंथांविषयीची कोणतीही तुलनात्मक भूमिका संवेदनशील ठरते. गोविंददेव गिरी यांच्या ताज्या वक्तव्यामुळे दोन्ही परंपरांमध्ये अनावश्यक वाद उभा राहू शकतो. संतपरंपरेच्या फडांमध्येही या विषयावर चर्चा सुरू झाली आहे. अनेक वारकरी संघटनांनी महाराजांच्या विधानाचा समाचार घेत निषेध व्यक्त केला आहे. राज्यभरातील वारकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मराठी संतसाहित्याच्या परंपरेत समर्थ रामदास यांचे स्थान अद्वितीय मानले जाते. अध्यात्म, नैतिकता, राज्यकारभार आणि लोकशिक्षण या सर्व विषयांना एकत्र विणणारा त्यांचा ग्रंथ म्हणजे दासबोध. या ग्रंथाच्या रचनेचा कालावधी हा अभ्यासकांमध्ये चर्चेचा विषय राहिला आहे. इतिहास, परंपरा आणि अंतर्गत संदर्भ यांच्या आधारे त्याकडे पाहणे आवश्यक ठरते. दासबोधाची रचना साधारणपणे १६५० ते १६८० या कालखंडात टप्प्याटप्प्याने झाली, असे बहुतेक संशोधक मानतात. समर्थ रामदासांनी आयुष्यभर केलेल्या प्रवास, साधना आणि शिष्यपरिवाराला दिलेले उपदेश यांचा सार या ग्रंथात उतरला. त्यामुळे हा ग्रंथ एखाद्या ठरावीक वर्षात लिहिला गेला नसून, अनेक दशकांच्या चिंतनातून साकारला, ही धारणा अधिक प्रमाणात ग्राह्य धरली जाते. समर्थांच्या जीवनातील उत्तरार्धात दासबोधाची अंतिम मांडणी झाली असावी, असे काही अभ्यासक सुचवतात. सज्जनगड, शिवथरघळ यांसारख्या स्थळी त्यांनी साधना आणि शिष्यांना उपदेश दिला. परंपरेनुसार शिवथरघळीतील निवांत काळात ग्रंथाची मोठी भागरचना झाली, असे सांगितले जाते. तथापि, या दाव्याला शाब्दिक पुरावे मर्यादित असले, तरी स्थानिक परंपरा आणि सांप्रदायिक वाङ्ममय त्यास पुष्टी देतात. असे असताना महाराजांनी चुकीचे संदर्भ दिल्याने वाद निर्माण झाला आहे.भारतातील धार्मिक-सामाजिक क्षेत्रात प्रभावी भूमिका बजावणाऱ्या व्यक्तिमत्त्वांमध्ये गोविंददेव गिरी महाराज यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. वेद, धर्मशास्त्र आणि अध्यात्म या विषयांवरील त्यांच्या प्रवचनांनी मोठा श्रोता वर्ग निर्माण केला आहे.तथापि, गेल्या काही वर्षांत त्यांच्या काही वक्तव्यांमुळे सार्वजनिक पातळीवर वादंग निर्माण झाले आणि त्यातून व्यापक चर्चा, टीका-प्रत्युत्तरांचा सिलसिला सुरू झाला.

धार्मिक नेत्यांचे वक्तव्य हे केवळ आध्यात्मिक परिघापुरते मर्यादित राहत नाही; तर ते समाजाच्या व्यापक भावनांशी जोडलेले असते. गोविंददेव गिरी महाराजांनी विविध प्रसंगी धर्म, राष्ट्र, संस्कृती आणि इतिहास यांसंबंधी केलेल्या भाष्यांमुळे काही सामाजिक गटांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. विशेषतः इतिहासाचे विश्लेषण, इतर धर्मांविषयीची मते किंवा समकालीन राजकीय प्रश्नांवर व्यक्त केलेली भूमिका या मुद्द्यांवरून त्यांच्यावर टीका झाली. धार्मिक व्यासपीठावरून व्यक्त होणारे मत हे अधिक संयमित व सर्वसमावेशक असावे. गोविंददेव गिरी महाराजांनी पूर्वीही काही प्रसंगी ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांविषयी किंवा सामाजिक चळवळींबाबत भाष्य केले होते. त्यावरून सामाजिक माध्यमांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. काही विधानांवर राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला, तर काही प्रकरणांत स्पष्टीकरण देण्याची वेळ त्यांच्यावर आली. धार्मिक नेत्यांच्या विधानांवरून समाजातील विविध घटकांमध्ये ध्रुवीकरण वाढण्याची शक्यता असते. सामाजिक माध्यमांमुळे प्रतिक्रिया अधिक तीव्र आणि तत्काळ स्वरूपात समोर येतात. लोकशाही व्यवस्थेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे मूलभूत मूल्य आहे; मात्र सार्वजनिक प्रभाव असलेल्या व्यक्तींनी आपल्या शब्दांची सामाजिक परिणामकारकता लक्षात घेणे तितकेच आवश्यक आहे. गोविंददेव गिरी महाराजांसारख्या प्रभावी धार्मिक नेत्यांनी मांडलेली मते लाखो लोकांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे त्यातील भाषिक संतुलन आणि समावेशकता महत्त्वाची ठरते. कोणतेही विधान वादग्रस्त ठरल्यास त्यावर संवाद, चर्चासत्रे आणि तर्काधारित प्रतिसाद हीच लोकशाहीची खरी दिशा आहे. वैचारिक मतभेदांना वैयक्तिक पातळीवर नेण्याची प्रवृत्ती टाळली गेली पाहिजे.

वाद निर्माण होणे हे लोकशाही समाजाचे लक्षण असले, तरी त्या वादातून विधायक संवाद घडणे अधिक आवश्यक आहे. व्यक्तीपेक्षा विचारांचा चिकित्सक अभ्यास आणि परस्पर आदराची भावनाहीच पुढील वाटचालीची दिशा ठरली पाहिजे. मराठी संतसाहित्याच्या आकाशात तेजस्वी तारा ठरलेला ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. या ग्रंथाचे स्वरूप समजून घेण्यासाठी प्रथम एक मूलभूत प्रश्न विचारावा लागतो. ज्ञानेश्वरी हे नेमके कशाचे भाष्य आहे, याचे सरळ उत्तर असे, की ज्ञानेश्वरी ही भगवद्गीता या संस्कृत धर्मग्रंथावरील मराठी भाष्य आहे; परंतु हे उत्तर जितके सोपे वाटते, तितकेच त्यामागचे आशयविश्व गहन आणि बहुआयामी आहे. महाराजांनी हे लक्षात घ्यायला हवे होते. ज्ञानेश्वरी ही केवळ शब्दशः भाषांतर नाही. तिचे रचनाकार संत ज्ञानेश्वर यांनी गीतेतील प्रत्येक अध्याय, प्रत्येक श्लोक मराठी ओवीबद्ध शैलीत उलगडताना त्यात आपल्या अनुभवाचा आणि तत्त्वचिंतनाचा सखोल ठसा उमटवला. गीतेतील तत्त्वज्ञान लोकभाषेत आणणे, हा केवळ भाषिक प्रयोग नव्हता, तर तो सामाजिक क्रांतीचा भाग होता. त्या काळात संस्कृत ही विद्वानांची भाषा होती. सामान्य जनतेपर्यंत धर्मग्रंथांचा आशय पोहोचत नव्हता. ज्ञानेश्वरांनी गीतेचा गूढ आशय मराठीतून सांगत तो सर्वसामान्यांसाठी खुला केला. त्यामुळे ज्ञानेश्वरी ही भाष्य असूनही लोकशिक्षणाचे साधन ठरली. गीता ही कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या उपदेशाचे तत्त्वज्ञान आहे. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग यांचा संगम.

ज्ञानेश्वरीत हा उपदेश केवळ तत्त्वचर्चा राहत नाही; तो जीवनानुभवाशी जोडला जातो. उपमा, रूपके, ग्रामीण प्रतिमा, निसर्गचित्रण यांमुळे गीतेचा गूढ आशय सहज आणि जिवंत वाटतो. भाष्यकार म्हणून ज्ञानेश्वरांनी गीतेतील अद्वैताचा गाभा स्वीकारला; परंतु त्याला भक्ती आणि अनुभवाची उब दिली. त्यामुळे ज्ञानेश्वरीत तत्त्वज्ञान आणि काव्य यांचा सुंदर मेळ दिसतो. हे भाष्य गीतेचे स्पष्टीकरण देताना स्वतःचे स्वतंत्र साहित्यिक अस्तित्वही निर्माण करते. ज्ञानेश्वरी ही गीतेचे भाष्य असले, तरी ती मध्ययुगीन महाराष्ट्राच्या सामाजिक-भाषिक जागृतीची घोषणा आहे. भाष्य या संकल्पनेला ज्ञानेश्वरांनी नवा आयाम दिला. त्यांनी मूळ ग्रंथाचा आदर राखत त्याला लोकाभिमुख केले. त्यामुळे ज्ञानेश्वरी ही गीतेची सावली नसून तिचा सजीव विस्तार आहे, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. संत एकनाथ यांनी रचलेले एकनाथी भागवत हे मूलत: भागवत पुराण या ग्रंथातील अकराव्या स्कंधावर आधारित मराठी भाष्य आहे. याची रचना सुसूत्र, अध्यायबद्ध आणि एकात्म आहे. एकनाथांनी निवडक स्कंधावर भाष्य करताना मूळ संस्कृत आशयाचे स्पष्टीकरण, विस्तार आणि तत्त्वचिंतन मराठीतून मांडले. त्यामुळे एकनाथी भागवत हा केवळ अभंगांचा किंवा विखुरलेल्या रचनांचा संग्रह नसून, एक ठरावीक उद्देशाने आणि संरचनेने लिहिलेला स्वतंत्र ग्रंथ मानला जातो.संत तुकारामांची गाथा आणि संत नामदेवांच्या अभंगांची रामदासांच्या दासबोधाशी त्यांची गोविंददेव गिरी महाराजांनी तुलना करणे केवळ अप्रस्तुत नाही, तर मधमाशाच्या पोळावर मुद्दाम दगड फेकण्यासारखे आहे. त्यामु‍ळे मधमाशा डंख करणार हे ओघाने आलेच.

भागा वरखडे

error: Content is protected !!
Exit mobile version