नाशिक, ८ ऑगस्ट २०२३ : जिल्ह्यात उद्योगांचा अधिक विकास करुन रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करत जिल्ह्यातील तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देण्यासाठी आपला प्रयत्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी भवनात भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन भुजबळ व विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ना. छगन भुजबळ म्हणाले की, जिल्ह्यात नाशिक पर्यटन, कृषी, मेडिकलला अधिक वाव आहे. यापुढील काळात आयटी हबसह अनेक उद्योग वाढवण्यासाठी प्रयत्न करुन नोकरीच्या संधी निर्माण करण्यात येईल.
राज्य शासनाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव या माध्यमातून ७५ हजार शासकीय नोकऱ्या देण्याचा महाराष्ट्र शासनाचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यावेळी सुमारे साडेआठ हजारांहून अधिक तरुणांनी नोंदणी केली, तर तीन हजारांहून अधिक तरुणांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. नोकरी महोत्सवात ५० हून अधिक कंपन्या सहभागी झाल्या. नोकरी महोत्सवासाठी जॉब फेअर इंडिया या कंपनीच्या वतीने सहकार्य करण्यात आले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर