मुंबई, ३ ऑगस्ट २०२३ : शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्या संदर्भातील कागदपत्रे ही सरकारकडे सादर केली होती. मात्र भाजप नेते आणि आमदार राहुल कुल यांना सरकारकडून क्लीन चिट देण्यात आली आहे. त्यामुळे ही क्लीन चिट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्यावर पुणे जिल्ह्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचार प्रकरणी आरोप केले होते. त्यानंतर आता त्यांना क्लीन चिट मिळाल्याने राऊत यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मात्र क्लीन चिट मिळाल्याने राहुल कुल यांच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. कारण सरकारने दिलेली क्लीन चिट चुकिची असल्याची टीका करत तक्रारदार नामदेव ताकवणे यांनी सरकारवर आरोप केला आहे.
तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार राज्य सरकारने २०२१-२२ च्या वार्षिक अहवालावरून आमदार राहुल कुल यांना क्लीन चीट दिली आहे. परंतु तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार सण २०१६-१७ सालापासून झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. याकडे सरकारने काना डोळा केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर त्यांनी याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. तक्रारदार नामदेव ताकवणे हे याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर