सरकार बनवणार मोहाची दारू

मुंबई : दारूच्या विक्रीतून मिळणाऱ्या टॅक्सद्वारे कोणत्याही राज्याला सर्वाधिक महसून मिळतो, असं सारेच बोलतात. पण, जर सरकारच दारू बाजारात आणणार आहे असं म्हटलं तर विश्वास बसणार नाही, हो ना? परंतु असा विचार सरकार करत आहे,शिवाय त्यासाठीचा करारही झाला आहे. त्या दारूच्या बॉटलची किंमतही ठरवण्यात आली आहे.
सरकारनं मोहाची दारू बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. या दारूमध्ये अल्कोहोलही असेल. पहिल्यांदाच सरकार असं करणार आहे. या दारूला महुआ न्युट्रिबेव्हरेज असं नाव देण्यात आलं आहे. येत्या महिन्याभरात याची विक्री सुरू केली जाण्याची शक्यता सरकारकडून व्यक्त केली जात आहे.
या दारूमध्ये पोषण तत्वे असतील, असा दावा केला जात आहे. यात अल्कोहोलचे प्रमाण ५ टक्क्यांच्या आसपास असेल.
भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महामंडळाच्या साह्याने आयआयटी-दिल्लीने दोन वर्षांच्या संशोधनानंतर या पेयाची निर्मिती केली आहे.
याबाबत पत्रकारांशी बोलताना  महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीर कृष्णा यांनी सांगितले की, सध्या आम्हाला या पेयासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून परवानगीची गरज आहे. त्यानंतर दिल्लीतील पाच ठिकाणी हे पेय विकले जाणार आहे. ट्राईब्स इंडिया नावाच्या स्टोअर्समध्ये हे पेय मिळेल. त्याची किंमत ७५० एमएलच्या बॉटलसाठी ७५० रूपये इतकी आहे. हे पेय सहा प्रकारच्या फळांच्या फ्लेवरमध्ये उपलब्ध असेल.
या पेयाच्या निर्मितीसाठी या महामंडळानं राष्ट्रीय संशोधन विकास संस्थेशी करार केला आहे. त्यासाठी या पेयाच्या निर्मितीचं तंत्रज्ञानही दिलं जाणार आहे.अशी माहिती त्यांच्याकडून यावेळी देण्यात आली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा