रायगड, २० जुलै २०२३ : रायगड जिल्ह्यात खालापूर जवळ अत्यंत दुदैवी घटना घडली आहे. इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली आहे. २०० ते २५० लोकसंख्या असलेल्या या गावावर रात्री १०.३० ते ११.०० वाजण्याच्या सुमारास डरड कोसळली. यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० हुन अधिक लोक या ढिगाऱ्या खाली अडकल्याची माहिती आहे. काही जणांना वाचवण्यात एनडीआरएफ च्या टीमला यश आले आहे. या दुर्घटनेतील जखमींवर उपचार केले जात आहेत. या संपूर्ण घटनेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे ट्विट केले आहे. सरकार इर्शाळवाडीतील लोकांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
रायगड जिल्ह्यातील खालापूरनजिक इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना काल मध्यरात्री घडली. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.ही घटना कळताच काल मध्यरात्रीपासूनच मी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे. एनडीआरएफच्या दोन टीम घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या असून आणखी दोन टीम थोड्याच वेळात पोहोचत आहेत. प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता ते गतीने होत आहे. प्राथमिक माहितीनुसार एकूण ४८ कुटुंब येथे आहेत. सुमारे ७५ जणांना बाहेर काढण्यात यश आले असून ५ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत.
तर उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी ७.३० वाजल्यापासून मंत्रालयातील आपत्कालिन नियंत्रण कक्षात आहेत. तेथून रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खालापूरनजिक इर्शालगड परिसरात गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील नागरिकांच्या बचाव आणि मदतकार्याचे नियंत्रण करत आहेत. लवकरात लवकर मदत पोहोचावी यासाठी ते स्वतः आसपासच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकार्यांशी बोलत आहेत.दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर