वाघोली, दि. १२ सप्टेंबर २०२०: सातत्याने वाढणाऱ्या वाघोलीतील कोरोनाच्या प्रादुर्भावाला अटकाव करण्यासाठी १२ ते १७ सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यू पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यूची अंमलबजावणी करण्यासाठी वाघोली ग्रामपंचायत प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे.
जनता कर्फ्यू दरम्यान दुकानदार नागरिकांची अडचण सोडविण्यासाठी वार्ड निहाय समित्या स्थापन करण्यात आल्या असून पोलिसांच्या मदतीने परिस्थितीवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. वाघोलीतील कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होत असणारी संख्या आटोक्यात आणण्यासाठी १२ ते १७ सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय वाघोली कोरोना नियंत्रण समितीच्या वतीने घेण्यात आला आहे. याबाबतची जनजागृती ऑनलाइन सोशल मीडिया, व प्रसारमाध्यमाच्या मार्फत करण्यात आली आहे. वाघोलीतील मुख्य चौकांमध्ये नियमावलीचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत.
वाघोली ग्रामपंचायतीचे पदाधिकारी कर्मचारी यांची प्रशासकीय यंत्रणा जनता कर्फ्यूचे पालन करण्याबाबत सज्ज झाली आहे. संपूर्ण वाघोली गावांमध्ये कर्मचारी, पोलिसांच्या, मदतीने कारवाई करणार आहेत. मुख्य महामार्गावर वाहतूक सुरळीत चालू राहणार आहे. वाघोलीतील दुकानदार, नागरिकांनी जनता कर्फ्यूचे पालन करून सहभाग नोंदवावा अन्यथा कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
वाघोली कोरोना विषाणू नियंत्रण समितीच्या वतीने १२ ते १७ सप्टेंबर पर्यंत लागू केलेल्या जनता कर्फ्यूला ट्विटर, टेलिग्राम, व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून काही नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. परिस्थिती अनलॉक होत असताना वाघोली बंद करण्यात येणार असल्याने काहींनी नाराजी व्यक्त करून अनेक प्रश्न विचारले आहेत. विरोध होत असताना वाघोलीतील कोरोनाची परिस्थिती पाहता काहींनी समर्थन देखील दिले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे