पुरंदर दि.२९ मे २०२०: गेल्या दोन महिन्यापासून बंद असलेली केशकर्तनालये गुरुवार( दि.२८) पासून सुरू झाली आहेत. मात्र तरी देखील ग्राहक व कारागिरांच्या मनामध्ये कोरोनाची भीती कायम असल्याचे दिसते आहे. अनेक जण भीत भीतच दुकाने उघडत आहेत. तर सर्वसामान्य लोक सलून मध्ये जाण्यापासून दूरच राहत आहेत.
कोरोनाने राज्यामध्ये पाय ठेवताच राज्य सरकारने अनेक आस्थापने बंद ठेवण्याचा तातडीने निर्णय घेतला होता. हॉटेल, चित्रपटगृह, माॅल त्याचबरोबर केशकर्तनालये व स्पा इत्यादी कोरोनामुळे बंद ठेवली होती. दोन महिन्यात अनेक स्थित्यंतरे झालीत सुरुवातीला दारू दुकाने चालू झाली. नंतर कापड दुकाने व इतर आस्थापने, व्यवस्थापने सुरू झाली. त्यानंतर सलूनची दुकाने सुरू करण्यासाठी सुद्धा नाभिक संघटना कडून जोर धरला. याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागातील सलूनची दुकाने सुरू झाली आहेत. असे असले तरी खुद्दजे कारागीर या दुकानांमध्ये काम करणार आहेत, त्यांच्या मनामध्ये व जे ग्राहक दुकानांमध्ये जाऊन स्वतःचे केस कापुन घेण्यासाठी किंवा दाढी करण्यासाठी जाणार आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा करोना विषयीची धास्ती अजूनही कायम असल्याचे दिसून येते आहे.
सलुन दुकानदारांनी अगदी काळजी घेत दुकाने सुरू केले आहेत. दुकान सुरू केल्यानंतर सुरूवातीलाच संपूर्ण दुकान सॅनिटाईज केले जाते. खुर्च्या टेबलवरही सॅनिटायजर मारले जाते. त्याचबरोबर लागणारी सर्व हत्यारे सुध्दा निर्जंतुक केली जात आहेत. त्याचबरोबर आलेल्या ग्राहकांची नोंद सुद्धा करून घेतली जाते आहे. अनोळखी लोक असतील तर त्यांची केस दाढी करण्यासाठी नकार दिला जातो आहे.
केशकर्तनालये सुरू झाली तरी ग्राहक फारच कमी प्रमाणात येत आहेत. आमच्याकडून दक्षता घेतली जात आहे. पण काम करणारे कारागीर व ग्राहक अजुनही इकडे यायला तयार नाहीत.त्यामुळे दुकाने उघडली तरी ग्राहकांनी मात्र इकडे पाठ फिरली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी