पुणे, १० सप्टेंबर २०२०: पुण्यातील साबळे वाघिरे कंपनी संभाजी बिडी नावाने बिडीचे उत्पादन करत असून ते बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसही आहे. मात्र, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने बिडीचे उत्पादन करणे योग्य नसून हा छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान असल्याच्या संतप्त भावना शिव-शंभूप्रेमींकडून व्यक्त होत होत होत्या. यात मागील काही दिवसांपासून संभाजी ब्रिगेड आणि काही राजकीय संघटनांनी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला आंदोलन सुरु केले होते. यानंतर अखेर संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय साबळे वाघिरे कंपनीने घेतला आहे. कंपनीने प्रसिद्धिपत्रक काढून याबाबतची माहिती दिली.
संभाजी ब्रिगेड, शिवधर्म फाऊंडेशन आणि इतर शिवप्रेमी संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जनभावनेचा आदर करुन आम्ही विडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे साबळे वाघेरे आणि कंपनीचे संचालक संजय वाघिरे यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले
या यशामध्ये महत्त्वाची भूमिका होती ती संभाजी ब्रिगेडची. संभाजी ब्रिगेड ने अनेक वर्षापासून ही मागणी लावून धरली होती. काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातही संभाजी बिडीविरोधात आंदोलन करण्यात आलं होतं. राज्यातील अनेक ठिकाणी हे आंदोलन पाहायला मिळालं. या आंदोलनानंतर आता साबळे वाघिरे कंपनीने संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र नाव बदलण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याचे कंपनीने म्हटलं आहे.
यासाठी आता कंपनीला नवीन नाव रजिस्टर करून घेणे आवश्यक असणार आहे. कारण बाजारात उत्पादन वेगळ्या नावाने आणण्यासाठी उत्पादनाचा ट्रेडमार्क देखील रजिस्टर करणे आवश्यक असते. असे केल्यानंतर या बिडी उत्पादनावर नवीन नाव छापले जाईल.असे कंपनीने आपल्या पत्रकामध्ये म्हटले आहे
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे