गोल पोस्ट इतर हिंगोली-मुंबई रेल्वेला हिरवा कंदील; खासदार हेमंत पाटील यांच्या मागणीला यश, ता. ३०...

हिंगोली-मुंबई रेल्वेला हिरवा कंदील; खासदार हेमंत पाटील यांच्या मागणीला यश, ता. ३० जानेवारीपासून धावणार रेल्वेगाडी

पुणे, २२ जानेवारी २०२३ : हिंगोलीवरून मुंबईकरिता स्वतंत्र रेल्वेसेवा सुरू करण्यात यावी, यासाठी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी सातत्याने मागणी लावून धरली होती. त्यांच्या या मागणीला अखेर यश आले असून ता. ३० जानेवारीपासून नांदेड-हिंगोली-मुंबई रेल्वे धावणार असल्याची माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिली आहे.

येत्या ता. ३० जानेवारी २०२३ पासून नियमित वेळेत आठवड्यातून दोन दिवस ही रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे. दर सोमवारी गाडी क्रमांक ०७४२६ आणि दर बुधवारी गाडी क्रमांक ०७४२८ ही रेल्वे रात्री ९ वाजून १५ मिनिटांनी नांदेड रेल्वेस्टेशनवरून निघणार असून, नांदेड-पूर्णा-वसमत-हिंगोली-वाशीम-अकोला-मलकापूर- भुसावळ-चाळीसगाव-मनमाड-नाशिक रोड-इगतपुरी-कल्याणमार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस येथे जाईल. तर परतीच्या प्रवासाला ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर मंगळवारी गाडी क्रमांक ०७४२७ आणि दर गुरुवारी गाडी क्रमांक ०७४२९ ही रेल्वे सायंकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी निघून नांदेड येथे सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी पोचणार आहे.

खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री राबसाहेब दानवे यांच्या भेटी घेऊन हिंगोलीहून मुंबईला जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरू करण्याची मागणी केली होती. त्या मागणीला अखेर यश आले असून, यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हिंगोली-नांदेड-यवतमाळ जिल्ह्यांतील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी यांना मोठा लाभ होणार आहे.

यापूर्वी हिंगोली जिल्ह्यातील जनतेला मुंबई जायचे असले तर नांदेड किंवा परभणीवरून देवगिरी, नंदीग्राम किंवा तपोवन या रेल्वेने जावे लागायचे. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असे; परंतु आता ही गैरसोय दूर झाली असून, रेल्वेसेवा सुरू झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version