रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुरात ७५ फुटी राष्ट्रीय ध्वजाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण

राजापुर, रत्नागिरी ४ नोव्हेंबर २०२३ : राजापूर तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ७५ फूट उंच राष्ट्रीय ध्वजाचे लोकार्पण आज करण्यात आले. कळ दाबून या ध्वजस्तंभावर ध्वजारोहण करण्यात आले. येत्या काळात रत्नागिरी येथील पोलीस क्रीडांगणावर १५० फूट उंचीचा आणि राज्यातील चौथ्या क्रमांकाचा असणारा ध्वज उभारला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी मार्गदर्शनात दिली.

या लोकार्पण सोहळयास खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, माजी आमदार हुस्नबानो खलिपे आदी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर पोलीस बॅंड पथकाने राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत धून वाजवून ध्वजाला सलामी दिली. यावेळी तिरंग्यातील फुगे हवेत सोडण्यात आले. यानंतर कोनशिलेचे अनावरण पालकमंत्री श्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.

पालकमंत्री सामंत यावेळी म्हणाले, स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षात रायगडमध्ये १३ ठिकाणी आणि रत्नागिरीत ९ ठिकाणी ७५ फूट उंचीचे ध्वज उभे करणारे राज्यातील हे पहिले दोन जिल्हे आहेत. रत्नागिरी पोलीस क्रीडांगणावर १५० फूट उंचीचा राज्यातील चौथ्या क्रमांकाचा ध्वज उभारला जात आहे, तर ५ व्या क्रमांकाचा ध्वज रायगडमध्ये उभारण्यात येत आहे. यासाठी १ कोटी ३० लाख रुपये जिल्हा नियोजन मधून खर्च करण्यात आले. विकासासाठी, देशासाठी पक्षीय विचार बाजूला ठेवून सर्वजण या कार्यामध्ये सहभागी झाले, त्यासाठी सर्व सदस्यांना धन्यवाद देतो. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी हा आदर्श आहे, असेही ते म्हणाले.

७५ फुटावर तिरंगा डौलाने फडकतोय ही अभिमानाची बाब असल्याचे खासदार श्री.राऊत म्हणाले. तर, जिल्ह्यात ९ ठिकाणी ७५ फूट उंच ध्वज उभा करणारा रत्नागिरी जिल्हा राज्यात पहिला असेल, असे आमदार श्री .साळवी म्हणाले. यावेळी स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा आणि माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांताधिकारी वैशाली माने यांनी, तर तहसिलदार शीतल जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : केतन पिलणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा