दुबई, १९ फेब्रुवारी २०२५ : आजची लढाई ही ज्ञानाची आणि लेखणीची असून युवकांनी दगड, तलवारी उचलण्यापेक्षा शिव-शंभू चरित्रातून प्रेरणा घेऊन विश्ववंद्य शिवरारायांचे विचार अंगीकारावेत, असे मत सुप्रसिद्ध अभिनेते, विचारवंत, शिव-फुले-शाहू-आंबेडकर आणि संत तुकाराम महाराज यांचे विचार प्रसारक किरण माने यांनी, दुबई येथे ११ व्या ज्ञानवर्धक शिवजयंती निमित्त मार्गदर्शनपर बोलताना व्यक्त केलं.
‘शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात’ या भव्य संकल्पनेतून शिवजयंती जगभरातील विविध देशात साजरी करण्यात येते. वाळवंटात वसलेले स्वर्ग म्हणजे दुबई. सालाबादप्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विचार मंच, दुबई आणि सत्यशोधक, दुबई यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानवर्धक शिवजयंती सलग ११ व्या वर्षी दुबई, संयुक्त अरब अमिराती येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या ज्ञानवर्धक शिवजयंतीसाठी प्रमुख व्याख्याते म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते, विचारवंत, शिव-शाहु-फुले-आंबेडकरी विचार प्रसारक किरण माने उपस्थित होते. तसेच लाइटिंग डिझायनर आणि व्हिज्युअल पोएट्री, दुबईच्या संस्थापक दिपाली शिरसाठ आणि वरिष्ठ व्यवसाय विकास व्यवस्थापक राजेश पाटील हे उपस्थित होते.
शिवजयंती सोहळ्याची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला वंदन, जिजाऊ ब्रिगेड दुबई टीमच्या महिलांच्या जिजाऊ वंदना गायन आणि दुबई मधील पहिल्या महिलांच्या “स्वामिनी ढोल-ताशा पथकाच्या” जोरदार वादनाने झाली. राहुल सणस यांनी दिलेली शिव-शंभू गर्जना ऐकून उपस्थित सर्वजण भारावून गेले. त्यानंतर अभिनेते आणि विचारवंत किरण माने यांनी शिवराय ते भीमराय व्हाया बुद्ध ते तुकाराम महाराज असा प्रवास सांगितला. राजमुद्रेत लिहिल्याप्रमाणे शिवाजी महाराज हे विश्ववंदनीय आहेत. आजच्या युगात शिवराय आले असते तर ते तलवार किंवा ढाल घेऊन येणार नाहीत, ते शिक्षणसत्ता,अर्थसत्ता, धर्मसत्ता, राजसत्ता, प्रसार-माध्यमसत्ता हाती घेऊन संविधानाच्या चौकटीत राहून लोककल्याणाकरिता वापरतील. सर्व जाती धर्मातील लोकांना, युवकांना, महिलांना सोबत घेऊन आजच्या शतकात लागणाऱ्या अत्याधुनिक उपाययोजना उपलब्ध करून देतील. इतिहासातील लढाई ढाल आणि तलवारीच्या जीवावर करण्याची होती पण आजची लढाई ही ज्ञानाची, शिक्षणाची आणि लेखनीची आहे. त्यामुळे उचलयाचीच तर जबाबदारी उचला. कावेबाज धर्मांध लोकांच्या मागे जाऊन दगड आणि तलवारी उचलु नका हा शिवसंदेश दिला.
आजकाल शिवचरित्राच्या बदनामीचे षडयंत्र रचले जात असून, विशिष्ट वर्ग त्यासाठी व्हाट्सएप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून रात्र आणि दिवस काम करीत आहे. याचेच फलित म्हणून पुण्यातील एक शिवद्रोही स्वयंघोषित कलाकार छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून लाच देऊन सुटले म्हणून समाजमाध्यमातून महाराजांची बदनामी करण्याचे धाडस करू शकला. आपण अशा गोष्टी महाराजांचा खरा इतिहास अभ्यासून, सत्यशोधन आणि चिकित्सा करून खोडून काढल्या पाहिजेत, असे विचार माने यांनी उपस्थित शिवप्रेमींना समजावून सांगितले. याचबरोबर, शिव फुले शाहू आणि आंबेडकर ही महाराष्ट्राची विचारधारा शिवप्रेमींना समजावून सांगितली. आजच्या युवकांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रमाणे पराक्रमी, विद्वान्, लेखक, वाचक आणि बहुभाषिक व्हावे आणि शिव-शंभू चरित्रातून प्रेरणा घ्यावी असे मार्गदर्शन केले. याच वेळी तुकाराम महाराजांच्या विविध अभंगाचे दाखले देत आजच्या काळात हे विचार कसे उपयुक्त आहेत यावर प्रबोधन केले.


दिपाली शिरसाठ यांनी त्यांचा लायटिंग डिजाईन मधील प्रेरणादायी प्रवास उपस्थित शिवप्रेमींच्या समोर मांडला. प्रत्येकाला यशस्वी व्हायचे असेल तर शिवरायांचा प्रेरणादायी जीवनपट समोर ठेवावा आणि स्वतःच्या क्षेत्रात सर्वोच्च व्हावे असा संदेश दिला आणि शिवचरित्रातून कशी प्रेरणा घ्यायची यावर प्रकाशझोत टाकला. राजेश पाटील यांनी उपस्थित अनिवासी भारतीय आणि महाराष्ट्रातील शिवप्रेमींना आजच्या जगात आर्थिक नियोजन, स्वतःचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसे आणि का महत्वाचे आहे, वैयक्तिक आणि कामाचे ताण तणाव कसे हाताळावे हे सांगितले. याचबरोबर, शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहाच्या वेळी आपले किल्ले मोघलांना दिले पण त्यानंतर खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात करत कित्येक किल्ले स्वराज्यात सामील करून घेतले आणि स्वराज्यविस्तार केला हे अतिशय मोजक्या शब्दात उपस्थित शिवप्रेमींना समजावून सांगितले आणि यातून प्रेरणा घेत आजच्या जगात यशस्वी होण्याचा कानमंत्र दिला.
यानिमित्त चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मुकुंदराज पाटील यांनी सत्यशोधक आणि त्यांची कार्ये तसेच गेल्या १० शिवजयंती च्या कार्याविषयी माहिती दिली. आतापर्यंतचा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विचार मंच व सत्यशोधक दुबई’ यांचा प्रवास सर्वांसमोर सादर केला. यानंतर अभिजित देशमुख आणि अरहंत पाथर्डे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम भोसले आणि दीपक जोगदंड यांनी केले. कार्यक्रम ऑनलाईन करण्याची जबाबदारी आशिष जीवने यांनी व्यवस्थित पार पाडली. तसेच ब्लॉगर ज्योती सावंत यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हा कार्यक्रम हजारो शिवप्रेमी पर्यंत पोहचवला. शेवटी पंकज शारदा रमेश आवटे यांनी आभार व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आशिष जीवने, राजेश पाटील, विक्रम भोसले, अभिजीत देशमुख, विजयसिंह शिंदे, संतोष सपकाळे, सुनंदा सपकाळे, मुकुंदराज पाटील, निखिल गणूचे, दीपक जोगदंड, जितू सपकाळे, जयंत रंगारी, अरहंत पाथर्डे, राहुल सणस, अभिजित इगावे, विनायक पवार, साईनाथ मांजरे, रामेश्वर कोहकड़े, अमोल कोचळे व पंकज आवटे यांनी अथक आणि विशेष परिश्रम घेतले. तसेच जई सुर्वे, सुनीता देशमुख, राहुल घोरपडे, विजयेंद्र सुर्वे, संदीप कड, संतोष गायकवाड, अमोल डुबे-पाटील, विशाल जगताप, अनिल थोपटे-पाटील, महेश येसडे, आशिष जगताप, साईनाथ पेडणेकर, योगेश मैद-सोनार यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
दुबई येथे सलग ११ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवर साजऱ्या होणाऱ्या ज्ञानवर्धक शिवजयंतीसाठी – संयुक्त अरब अमिराती मधील दुबई, अबुधाबी, शारजाह, अजमान, फुजेराह,उम अल क्विन आणि रास अल खैमा येथून शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
न्यूज अनकट दुबई प्रतिनिधी