माढा, १० नोव्हेंबर २०२०: विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यावर सोमवार दि. 9 नोव्हेंबर रोजी कारखान्याकडे तोडणी वाहतुक करणारे वाहनमालक, ड्रायव्हर व बैलगाडीवान यांचेकरीता अप्पर पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य, मुंबई डॉ. भुषणकुमार उपाध्याय व पोलिस अधिक्षक श्री. संजय जाधव महामार्ग सुरक्षा पथक, पुणे विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली अपघाताचे प्रमाण कमी करण्याचे दृष्टीने महामार्ग पोलिसांकडुन महाराष्ट्रभर वाहनधारकांना जनजागृतीचे प्रबोधन केले जात आहे. त्या अनुषंगाने महामार्ग पथक मोडनिंब येथील पोलीस उपनिरिक्षक रामेश्वर पडवळ यांचे वतीने काररखाना कार्यस्थळावर वाहतुक सुरक्षा संदर्भात मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचा सन 2020-21 गळीत हंगाम चालू असून कारखान्याकडे तोडणी वाहतुक करणारे वाहनमालक, ड्रायव्हर व बैलगाडीवान यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतुकीच्या नियमांचे अवलोकन व्हावे यासाठी महामार्ग पोलिस मोडनिंब विभागाचे पोलीस उपनिरिक्षक रामेश्वर पडवळ यांनी ऊस वाहतुक करणारी वाहने व बैलगाडी यांना कशा पध्दतीने रिफ्लेक्टर बसवावेत याचे प्रात्यक्षिक दाखवून वाहतुकीच्या नियमांचे महत्त्व पटवून दिले व त्यानुसार सर्व संबंधित वाहन मालकांनी व बैलगाडीवान यांनी याची दक्षता घेण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. तसेच कर्कश आवाजात वाहनावर साऊंड बॉक्सने गाणे वाजवू नये, वेळोवेळी वाहनांची आर.टी.ओ. कडून तपासणी करून घ्यावी, वाहन चालकाकडे लायसन्स असणे आवश्यक इत्यादी बाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच कारखान्यामार्फत करारातील ऊस वाहतुक करणा-या सर्व वाहनांना सुरक्षिततेच्या दृष्टीने कापडी रिफ्लेक्टरचे वाटप करण्यात आलेले आहे.
याप्रसंगी महामार्ग पोलीस मोडनिंब विभागाचे पोलीस नाईक दिनेश हाके, आबा रूपनवर व कारखान्याचे कार्यकारी संचालक आर.एस. रणवरे, जनरल मॅनेजर एस.आर.यादव, मुख्य शेतकी अधिकारी एस.पी.थिटे, ऊस पुरवठा अधिकारी एम.एस.चंदनकर, एन.एन. गायकवाड,सुरक्षा अधिकारी एफ.एम.दुंगे, हेडक्लार्क बी.एम.मुलाणी तसेच वाहनमालक, बैलगाडीवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रदीप पाटील