गुजरात मॉडेलच्या गप्पा मारणाऱ्यांनो महाराष्ट्रधर्म पाळा : आव्हाड

राज्यामध्ये कोविड -१९ प्रादुर्भावाची वाढती संख्या तसेच त्यापासून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. यावरून भाजप नेत्यांनी राज्यातील महाआघाडी सरकारवर सातत्याने टीका केली आहे. टीका करत असलेल्या या विरोधी पक्षातील नेत्यांना राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी चांगलेच सुनावले आहे. टीकेला उत्तर देताना जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यातील कोविड -१९ च्या संख्येचा तपशील दिला आहे.

याचे उत्तर देताना आव्हाड यांनी ट्विट करत महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या मध्ये संसर्गामुळे होत असलेल्या मृत्यूंची टक्केवारी दिली आहे. ‘गुजरातमध्ये कोविड १९ मुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण ६.२५ टक्के आहे. त्याचवेळी महाराष्ट्रात हे प्रमाण अवघं ३.७३ टक्के आहे,’ असं त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात राहून गुजरात मॉडेलच्या गप्पा मारणाऱ्यांनो, जरा गुजरातमध्ये जाऊन त्यांना महाराष्ट्र पॅटर्न काय आहे तो दाखवून खरा महाराष्ट्रधर्म पाळा,’ असा टोलाही त्यांनी हाणला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी काल देखील असेच ट्विट करत टीकेला उत्तर दिले होते. महाराष्ट्रातील केवळ वाढलेला आकडा विरोधक सांगतात. महाराष्ट्राचा आकडा एक लाखाच्या पुढे गेला असे सांगणारे विरोधक महाराष्ट्रात किती रुग्ण बरे झाले हे सांगायला मात्र विसरतात. असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. वीट मध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘महाराष्ट्रात करोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून आजपर्यंतचा १ लाखाचा आकडा आवर्जून सांगतात. पण त्यातील ५० हजार पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत हे सांगायचं आवर्जून टाळतात. हा साधा चावटपणा नाही, हा भलामोठा कट आहे. गुजरातचा मृत्यूदर सांगा की,’ काल दिलेल्या या उत्तरानंतर आज पुन्हा त्यांनी ट्विट करत विरोधकांची चांगलीच खबर घेतली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा