पुणे, दि.१३ जून २०२०: संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे सायंकाळी ४.४५ मिनिटांच्या सुमारास प्रस्थान झाले. अलंकापुरीत आणि इंद्रायणी काठावर पहिल्यांदाच प्रस्थानाच्या दिवशी एवढा शुकशुकाट पहायला मिळाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
ना डोक्यावर तुळशी वृंदावन असणाऱ्या महिला ना मनोरे उभे करणारे वारकरी, ना भाविकांची गर्दी… ना दिंड्यानी केलेली गर्दी…सारे काही सोपस्कार शांततेत आणि परंपरा जपत पार पाडण्यात आले.
माऊलींच्या समाधी मंदिरात पहाटे चार वाजता घंटा नादाने या वैभवी प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर काकड़ आरती झाली. पहाटे सव्वाचार ते साडे पाच यावेळात माऊलीना पवमान अभिषेक, पंचामृत पूजा व दुधारतीचा कार्यक्रम झाला.
सकाळी नऊ ते अकरा दरम्यान वीणा मंडपात कीर्तन संपन्न झाले. दुपारी बारा ते साडेबारा मंदिर गाभारा स्वच्छ करण्यात आला.त्यानंतर समाधीस पाणी घालण्यात येऊन महानैवेद्य दाखविण्यात आले.दुपारी चार वाजता मुख्य प्रस्थान कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. मोजक्याच पन्नास वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. श्रीगुरु हैबतबाबा प्रतिनिधीं तर्फे श्रींची आरती करण्यात आली.
संस्थान तर्फे देखील श्रींची आरती करण्यात येऊन त्यानंतर प्रमुख मानकऱ्यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात आले. त्यानंतर वीणा मंडपात श्रींच्या चल पादुका आणण्यात आल्या. संस्थान तर्फे मानकऱ्यांना मानाची पागोटी वाटप करण्यात आले तर श्रीगुरू हैबतबाबा प्रतिनिधीं तर्फे दिंडीप्रमुख, प्रतिष्ठित मानकरी यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात आले.
पादुका वीणा मंडपातून व मंदिर प्रदक्षिणा करून दर्शन मंडप हॉल येथे विराजमान करण्यात आल्या. समाज आरती , रात्री अकरा ते पहाटे साडेचार जागराचा कार्यक्रम संपन्न झाला.शनिवारी (दि.१३) ते मंगळवार (दि.३० ) पर्यंत पादुका मंदिरातच राहणार असून पुढील शासन निर्णयानुसार पादुका हेलिकॉप्टर किंवा वाहनाने पंढरपूरला नेण्यात येणार आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी