हडपसर अमरधाम स्मशानभूमीत भयावह दृश्य! भटक्या कुत्र्यांकडून मृतदेहांची नासधूस

54
हडपसर अमरधाम स्मशानभूमीत भयावह दृश्य! भटक्या कुत्र्यांकडून मृतदेहांची नासधूस

Hadapsar Amardham Crematorium security : हडपसरच्या अमरधाम स्मशानभूमीत सुरक्षा व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. मृतदेहांचे अर्धवट जळालेले अवयव भटके श्वान खात असल्याचे धक्कादायक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या घटनेमुळे मृतांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पुणे महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मृतदेहांची विटंबना होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

रात्रीच्या गस्तीचा अभाव:

रात्रीच्या वेळी स्मशानभूमीत सुरक्षा रक्षकांची गस्त नसल्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. मृतदेहांवर ताव मारणाऱ्या कुत्र्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे महापालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महापालिका प्रशासनाची भूमिका संशयास्पद:

या गंभीर घटनेनंतरही महापालिका प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. हडपसर क्षेत्रीय अधिकारी बाळासाहेब ढवळे आणि उपायुक्त सोमनाथ बनकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या घटनेवर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

तातडीने उपाययोजना करण्याची मागणी: हडपसर स्मशानभूमीत तातडीने सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच, या घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे