हडपसर पोलिसांची कारवाई, ४४ हजार रुपयांची दारू जप्त..!

हडपसर, दि. ११ ऑगस्ट २०२० : हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुरसुंगी गावा जवळ मंतरवाडी रस्त्याने धनकवडीकडे एक फोर्ड आयकॉन गाडी जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामध्ये गावठी दारुचे कॅन असल्याचीही गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानूसार फुरसुंगी गावाजवळ 2 पथके तयार करुन सापळा रचण्यात आला व खंडणी विरोधी पथकाने तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्यावर फुरसुंगी येथील तरवडे वस्ती येथे कारवाई करण्यात आली व कारवाईत दोन्ही आरोपींकडून अडीच लाख रुपयांची कार व ४४ हजार रुपयांची ४४० लिटर देशी दारू जप्त करण्यात आली आहे. अनिकेत रविंद्र कुंभार वय २४ रा. संबजी नगर धनकवडी, व राकेश रतन कुंभार वय ४० रा. धनकवडी अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी पोलीस नाईक अमोल पिलाणे यांनी फिर्याद दिली आहे . यानंतर या गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेऊन गाडीची झडती घेऊन गाडीच्या डिक्कीमध्ये ६ कॅन व पुढच्या सीट जवळ १ कॅन अशी देशी दारू जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास हडपसर पोलिस करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा