Historic Faruqui Cannons from 1590 Found at Hadsar Fort: पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक हडसर किल्ल्यावर सुरू असलेल्या दुर्गसंवर्धनाच्या कार्यात एक अत्यंत महत्त्वाचा आणि रोमांचक शोध लागला आहे. येथे सापडलेल्या एका तोफेवरील फारशी शिलालेख वाचल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे: या तोफेची निर्मिती इसवी सन १५९० मध्ये मध्य प्रदेशातील अशीरगड किल्ल्यावर फारुकी राज्यकर्त्यांनी केली होती! प्रा. राजेंद्र जोशी, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे यांनी या संशोधनावर प्रकाश टाकणारा लेख प्रसिद्ध केला आहे.
गेली आठ वर्षे ‘मरहट्टे सह्याद्रीचे दुर्गसंवर्धन संस्था’ आणि ‘शिवाजी ट्रेल दुर्गसंवर्धन संस्था’ यांच्या मार्गदर्शनाखाली हडसर गडावर अविरत संवर्धन कार्य सुरू आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये कमानी टाके संवर्धनाचे काम सुरू असताना एकूण तीन तोफा सापडल्या.
त्यापैकी दोन चांगल्या स्थितीत होत्या, तर एक तुटलेली होती. या तिन्ही तोफांना सागवानी तोफगाडे बसवण्यात आले. कित्येक वर्षे चिखल-मातीत असल्याने तोफेवर गंज चढला होता. पावसाळ्यापूर्वी तोफेची डागडुजी करत असताना संस्थेच्या दुर्गसंवर्धकांना एक लेख दिसला. तो उर्दू किंवा फारशी असावा असा अंदाज होता, जो नंतर दुर्गसंवर्धक विनायक खोत यांनी फारशी असल्याचे निश्चित केले.
तोफेवर कोरलेला फारसी भाषेतील तीन ओळींचा शिलालेख अलीकडेच प्रा. राजेंद्र जोशी यांनी वाचला, ज्यामुळे ती इ.स. १५९०-९१ (हिजरी ९९८) मधील असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या माहितीनुसार, ही तोफ फारुकी घराण्यातील आदिलशाह (वडील-मुबारकशाह, आजा-आदिलशाह) यांच्या आदेशाने तयार केली होती. या तोफेचे अभियंते मलिक हसन बिन मुहम्मद वली मुहम्मद हे होते.
दुर्गसंवर्धक अमोल ढोबळे यांच्या म्हणण्यानुसार, “हा शोध केवळ इतिहास नव्हे, तर आमच्या संवर्धनाच्या कार्याची मोठी ऐतिहासिक पावती आहे.” या शोधाने हडसर किल्ल्याच्या इतिहासाला एक नवीन पैलू मिळाला असून, महाराष्ट्राच्या दुर्ग इतिहासात आणखी एका महत्त्वाच्या घटनेची भर पडली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे











































