हैदराबाद : हैदराबाद येथे प्रियांका रेड्डी या तरुणीला जाळून मारण्यात आले आहे. एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला आहे.
दिसायला अत्यंत सुंदर असलेल्या प्रियांकाची अशी अवस्था झालेली पाहून तिच्या घरचे तर हादरले आहेतच. शिवाय संपूर्ण देश हे फोटो पाहून भयभीत झाला आहे. प्रियांकाची स्कूटर शादनगर टोलनाक्याजवळ पंक्चर झाली होती. स्कूटरजवळ उभी असताना तिने तिच्या बहिणीला फोन केला होता. मी जिथे उभी आहे तिथे मला भीती वाटते आहे असे तिने बहिणीला सांगितले होते. या संभाषणानंतर तिचा फोन बंद झाला. त्यानंतर थेट तिचा मृतदेहच सापडला. मधल्या काळात नेमकं काय झालं याचे कोडे अजूनही पोलिसांना उलगडता आलेले नाही. प्रियांकाला जाळून मारण्याआधी तिच्यावर बलात्कार झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
प्रियांका ही पेशाने पशूवैद्यकीय क्षेत्रात होती. कोल्लूर इथल्या जनावरांच्या दवाखान्यात जाण्यासाठी ती घरून निघाली होती. तिने तिची स्कूटर टोलनाक्याजवळ लावली आणि टॅक्सी करून ती पुढे ऑफिसला गेली. कामावरून परतत असताना प्रियांका स्कूटरजवळ आली तेव्हा तिला ती पंक्चर असल्याचं दिसले. यावेळी तिला भीती वाटायला लागली होती म्हणून तिने बहिणीला फोन केला होता. बहिणीने टॅक्सी करून परत ये असं सांगितलं, तेव्हा प्रियांकाने काही माणसं माझी मदत करायला तयार आहेत असं सांगितलं. थोड्यावेळाने कॉल करते असं सांगून प्रियांकाने फोन ठेवला आणि त्यानंतर तिचा फोन बंद पडला.
प्रियांकाचा फोन बंद झाल्याने घाबरलेल्या बहिणीने हा प्रकार घरच्यांना सांगितला. त्या सगळ्यांनी प्रियांकाची शोधाशोध करायला सुरुवात केली. पोलिसांनाही कळवण्यात आलं. अखेर शादनगर टोलनाक्यापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या एका सबवेमध्ये तिचा पूर्णपणे जळाळेला मृतदेह सापडला. तिच्या गळ्यात असलेल्या लॉकेटवरून तिची ओळख पटवण्यात आली.
प्रियांकाच्या खुनाचे कोडे उलगडण्यासाठी सीसीटीव्ही दृश्ये खंगाळण्यात येत असून पोलिसांनी १० पथके नेमण्यात आली आहेत. तसेच श्वान पथकांचाही आधार घेतला जात आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.










































