जागतिक वडा-पाव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

पुणे,२३ ऑगस्ट, २०२२: आज जागतिक वडा-पाव दिवस आहे. वडा-पाव म्हणजे सामान्यांचे अन्न, मध्यमवर्गीयांच्या स्वाद आणि श्रीमंतांचे चोचले. पण प्रत्येकाला वडा-पाव हा हवाच असतो. आज जागतिक वडा-पाव दिनाच्या निमित्ताने वडापावचा इतिहास जाणून घेऊया ….

मूळचा महाराष्ट्राचा असलेला हा वडा-पाव हा शाकाहारी पदार्थातला आवडता पदार्थ म्हणून ओळखला जातो. बटाट्यापासून तयार करण्यात आलेला वडापाव केवळ सामांन्यांच्याच नाही तर सेलिब्रिटींचाही आवडता पदार्थ आहे. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच जण या वडा-पावचे चाहते आहेत.

मुंबईमध्ये सर्वसामांन्याचं रोजचं जेवण वडापाववर होतं. सुरुवातीला १५ पैशापासून सुरुवात झालेल्या वडापावची आजची किंमत ३० रुपये प्रति वडा-पाव आहे. मुबंईत १९६० साली वझे कुटूंबाने वडा-पावची निर्मिती केली, त्यानंतर १९६६ मध्ये मुंबईत दादरच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर अशोक वैद्य यांनी वडा-पावची सुरुवात केली.

वडा-पाव करण्यासाठी बटाटे उकडून त्यात मिरची, आलं-लसूण पेस्ट आणि हळद घालून बटाटा शिजवला जातो. त्यानंतर डाळीच्या पिठात पाणी घालून त्याची पेस्ट केली जाते. बटाट्याच्या भाजीचे गोळे करुन ते डाळीच्या पिठात बुडवून तेलात तळून घेतात. लादी पावामध्ये घालून तळलेल्या मिरचीबरोबर खायला देतात. ही वडा-पावची साधी रेसिपी.

पण आता या वडापावमध्ये अनेक प्रकार निर्माण करण्यात आले आहे. चीज वडा-पाव, कॉर्न वडा-पाव, स्टफ वडा-पाव, कट वडा-पाव असे अनेक प्रकार आता आहेत. त्याचबरोबर खिडकी वडा-पाव ही नवीन संकल्पना आता सुरु झाली आहे. शिव वडा-पाव हा शिवसेनेने सुरु केलेला वडा-पाव सध्या चर्चेत असून त्याची किमंत इतर वडापावच्या तुलनेत खूप कमी आहे. पण मूळ चवीची सर कोणालाच येणार नाही.
तेव्हा आज वडा-पाव खा आणि जागतिक वडा-पाव दिवस आनंदात साजरा करा.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा