इंदापूर नगरपरिषदेच्या उपाययोजनेचा हर्षवर्धन पाटलांनी घेतला आढावा

इंदापूर, दि. २० मे २०२०: महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज इंदापूर नगरपरिषद येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात इंदापूर नगरपरिषदेने केलेल्या उपयोजनांच्या संदर्भात आढावा घेतला.

महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी हर्षवर्धन पाटील यांनी फोनद्वारे संपर्क करून आपत्ती व्यवस्थापन किंवा जिल्हा नियोजन निधी म्हणून नगरपरिषदेला ५० लाख रुपयांचा निधी देण्याची, नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा पोलीस किंवा आरोग्‍य कर्मचारी प्रमाणे विमा उतरविणे तसेच कोरोना पार्श्वभूमीवर रुग्णवाहिकेची मागणी त्यांनी केली.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, कोरोना संचारबंदीच्या काळात तालुक्यात १८ हजार नागरिक मुंबई-पुणे तसेच बाहेरगावाहून आलेले आहेत. बाहेरून येणाऱ्या नागरिकांचे १४ दिवस विलगीकरण होणे आवश्यक आहे. शहरात स्टेट बँक, पीडीसी बँक तसेच बँक ऑफ महाराष्ट्र आणि दारु दुकानात होणारी गर्दी आटोक्यात येण्यासाठी पोलिस आणि होमगार्ड यांची नियुक्ती करून गर्दीचे नियंत्रण झाले पाहिजे. इंदापूर नगर परिषदेने कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भामध्ये योग्य परिस्थिती हाताळली आहे. बाहेरून येणाऱ्या लोकांना इन्स्टिट्यूशन क्वॉरंनटाईन करणे गरजेचे आहे. स्वच्छते संदर्भामध्ये भारत सरकारकडून थ्री स्टार मानांकन मिळाल्याबद्दल त्यांनी नगरपरिषदचे कौतुक केले.

नगरपालिकेने कोरोना आणि लॉकडाऊन तसेच येणारा पावसाळा लक्षात घेऊन उर्वरित स्वच्छतेची कामे, पाणीपुरवठा यासंदर्भात वेळीच योग्य तातडीच्या उपाययोजना करून आपल्या शहराच्या आरोग्याची दक्षता घेण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना त्यांनी केल्या.

आढावा बैठकीनंतर हर्षवर्धन पाटील यांनी बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये जाऊन बँक मॅनेजर यांच्याशी सोशल डिस्टन्स संदर्भात संवाद साधला. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी नगरपरिषदेकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

यावेळी इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, नगरसेवक भरत शहा, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, गटनेते नगरसेवक कैलास कदम तसेच गुड्डूभाई मोमीन आणि नगरपरिषदेचे प्रशासकीय कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा