गोल पोस्ट इतर राजकारण संसदेतून राज्यसभा सभागृह हद्दपार केले आहे का – सुप्रिया सुळे

संसदेतून राज्यसभा सभागृह हद्दपार केले आहे का – सुप्रिया सुळे

पुणे, २८ मे २०२३ : नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाले. या कार्यक्रमाला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला उपस्थित होते. पण राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांना निमंत्रणच देण्यात आले नाही. त्यावरून राष्ट्रादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाण साधला आहे. या कार्यक्रमाला लोकसभेच्या अध्यक्षांना बोलावले. परंतु संसदेत राज्यसभेचे ही सभागृह आहे ना? देशाचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष, देशाचे उपराष्ट्रपती आहेत. त्यांनाही बोलावले नाही. म्हणजे तुम्ही राज्यसभेला हद्दपार केले आहे का? संसदेत राज्यसभा आहे की नाही? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. ओम बिर्ला यांना बोलावले याचा आनंद आहे. त्याचं स्वागतच आहे. परंतु या सोहळ्याला राज्यसभेच्या अध्यक्षांना बोलवायलाच हवे होते. असा प्रश्न उपस्थित करून, हा कार्यक्रम व्यक्तीचा आहे की संसदेचा हे पाहिले पाहिजे, अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली.

सुप्रिया सुळे या प्रसार माध्यमांशी संवाद साधत होत्या. त्यावेळी त्यांनी हा सवाल केला. आम्हाला तीन दिवसांपूर्वीच संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाचा मोबाईलवर मेसेज आला. संसद ही देशातली लोकशाहीचे मंदिर आहे. आम्ही सर्व देशासाठी एकत्र आलो असतो तर संयुक्तिक ठरले असते.पार्लमेंट चालवण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांवर असते. अधिवेशनात बिल पास करायचे असतात तेव्हा पंतप्रधान, मोठे मंत्री आणि नेते या देशातली विरोधी पक्ष नेत्यांना फोन करतात. एरव्ही तुमचे काम असले तर मंत्री विरोधी पक्षाच्या नेत्यांना फोन करतात ना?, मग आता फोन का केला नाही?, असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला.

संविधानाने देश चालतो आणि लोकशाही असेल तर लोकशाहीत विरोधी पक्ष असलाच पाहिजे. संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही तोच आग्रह होता. हे संविधानातही आहे. लोकशाहीच्या मंदिराचे उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाला विरोधी पक्ष नसेल तर कार्यक्रम अपूर्ण आहे.या सरकारमधील एखाद्या वरिष्ठ नेत्याने किंवा मंत्र्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांना एखादा फोन जरी केला असता तर सर्वजण राजीखुशी गेले असते.असेही सुळे यावेळी म्हणाल्या

आजच्या कार्यक्रमाला देशातील सर्वच विरोधी पक्ष गेले नाहीत.जे गेले ते किती मनापासून गेले याचा विचार करा. मी नवीन वास्तू पाहिली नाही. परंतु मला जुनी वास्तू प्रिय आहे. जुन्या वास्तूच्या भिंती बोलक्या आहेत. माझ्यासाठी जुनी वास्तूच मंदिर असेल. असे सांगतानाच कशाचा इव्हेंट करू नका, संसदेचा तर नकोच. कारण ते लोकशाहीचं मंदिर आहे. आमची स्वत:ची ओळख नाही. जनतेने आम्हाला तिथे पाठवल्यामुळेच आमची ओळख आहे. असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version