नवी दिल्ली, २९ सप्टेंबर २०२०: निर्भया प्रकरणासारख्या सामूहिक बलात्कारानंतरही देशात मुलींवर बलात्कार होणं थांबलेलं नाही. स्थान आणि नाव बदलत आहे परंतु, मुलींची अवस्था आजही तशीच आहे. २०१२ मध्ये निर्भयावर सामूहिक बलात्कार करणाऱ्या दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, परंतु आजही समाजात असे लोक फिरत आहेत, जे कधी निर्भया तर कधी हाथरस मधील पीडित मुलींना आपल्या वासनेची शिकार बनवत असतात. अजूनही देशात अशी कृत्य थांबलेले नाहीत. अर्थात त्यांना कायद्याची कोणतीही भीती राहिलेली नाही.
हेच कारण आहे की उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील या गरीब कुटुंबातील मुलीचं दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात निधन झालं. नराधमांनी केवळ दलित मुलीवर सामूहिक बलात्कार केला नाही तर तिला जबर मारहाण केली ज्यामुळं तिचा मृत्यू झाला.
कोणताही पोस्टमार्टम रिपोर्ट न देता मृतदेह हलविला
हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेचे वडील व भाऊ सफदरजंग रुग्णालयात धरणावर बसले आहेत. आमच्या परवानगीशिवाय मृतदेह दवाखान्यातून नेण्यात आला असा आरोप त्यांनी केलाय. आम्हाला कोणताही पोस्टमॉर्टम अहवाल प्राप्त झाला नाही. आम्ही कोणत्याही कागदपत्रांवर सही केली नाही. आमच्या परवानगीशिवाय हॉस्पिटल मृतदेह कसा घेऊ शकतो असं या कुटुंबाचं म्हणणं आहे.
पीडितेच्या भावानं सांगितलं की, “वडिल रुग्णवाहिका चालकाशी बोलले आहे. रुग्णवाहिकानं यमुना एक्स्प्रेसवे ओलांडला आहे. वडिलांनी ड्रायव्हरला परत येऊन पोस्टमॉर्टम रिपोर्ट दाखवायला सांगितला आहे. जर पोस्टमार्टम रिपोर्ट आमच्या हातात मिळाला नाही तर हाथरसमध्ये पीडितेचा मृतदेह कोणीही स्वीकारणार नाही.
चंद्रशेखर आझाद यांचे डॉक्टरांवर गंभीर आरोप
त्याचवेळी भीम आर्मी चीफ चंद्रशेखर आझाद यांनी सफदरजंग रुग्णालयाच्या डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, सोमवारी रात्री डॉक्टरांनी व्हेंटिलेटरचे प्लग काढून टाकले होते, कारण पीडित दलित समाजातील असल्यानं पीडितेचा मृत्यू व्हावा अशी सरकारची इच्छा होती. चंद्रशेखर आझाद म्हणाले की, मुलीच्या पालकांसह येथे कोणताही पोलिस कर्मचारी नव्हता.
चंद्रशेखर आझाद आज पीडित मुलीच्या कुटुंबाला भेटण्यासाठी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात गेले. त्यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. मंगळवारी सकाळी हाथरस घटनेतील पीडितेचा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर या घटनेवर राजकीय गदारोळ सुरू आहे.
कुटुंब म्हणाले – एडीजी खोटं बोलत आहे
एडीजी (लॉ एन्ड ऑर्डर) प्रशांत कुमार यांच्या वक्तव्यावर पीडितेच्या कुटूंबानं प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एडीजी खोटं बोलत असल्याचं कुटुंबाचं म्हणणं आहे. पीडित मुलीनं आपलं २२ सप्टेंबर रोजी पहिलं विधान केलं होतं आणि सामूहिक बलात्कार झाल्याचं सांगितलं होतं. यापूर्वी कोणालाही माहिती नव्हतं की तिच्यावर बलात्कार करण्यात आलाय, कारण ती बेशुद्ध होती.
एडीजी काय म्हणाले?
एका वृत्तवाहिनीशी बोलताना एडीजी (लॉ एन्ड ऑर्डर) प्रशांत कुमार म्हणाले की, ही घटना १४ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता घडली. त्यानंतर, मुलीनं आपल्या भावासोबत पोलिस स्टेशन गाठलं आणि गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार केली. यानंतर मुलीला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही बाब SC/ST कायद्याशी संबंधित होती, म्हणून क्षेत्र अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याला ही तपासणी सोपवण्यात आली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे