पुणे, १ ऑक्टोंबर २०२०: हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरण अद्याप शमलं नसताना देशाच्या कानाकोपऱ्यातून गेल्या चोवीस तासात अनेक बलात्काराच्या घटना समोर आल्यात. उत्तर प्रदेश पासून ते राजस्थान पर्यंत आणि मध्यप्रदेश मधून समोर आलेली ही नवीन प्रकरणं हादरवून ठेवणारी आहेत. हाथरस प्रकरणात पीडितेवर ज्याप्रमाणं बलात्कार केला गेला व तिचा मृत्यू झाला यावरून देशात सगळीकडून आक्रोश व्यक्त केला जातोय. यासह आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी देखील मागणी करण्यात येतेय. असं असताना देखील देशातील इतर राज्यांमधून देखील बलात्काराच्या घटना समोर आल्यात, यावर एक नजर टाकूया…
बलरामपूर, उत्तर प्रदेश
हाथरसच्या घटनेनंतर उत्तर प्रदेशमधील बलरामपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. इथं एका दलित विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आलाय, यानंतर या पीडितेचा मृत्यू झाला. मृत्यू होतात काही वेळातच तिचे अंत्यसंस्कार देखील करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केलीय. असं सांगितलं जात आहे की, २२ वर्षीय तरुणी बऱ्याच वेळेपासून घरी न आल्यामुळं कुटुंबियांना चिंता वाटू लागली. त्यामुळं त्यांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु, काही वेळातच पीडित युवती रिक्षांनं अतिशय गंभीर अवस्थेत घरी पोहोचली. पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान तिनं आपला जीव गमावला.
बुलंदशहर, उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये एका अल्पवयीन मुलीनं आरोप केलाय की, शेजार्यानं अंमली पदार्थांचा वास घेऊन तिच्यावर बलात्कार केलाय. घटनेपासून आरोपी फरार असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपानुसार जेव्हा ती झोपली होती, तेव्हा शेजारच्या भागात राहणारा एक तरुण घरात आला आणि त्यानं तिच्यावर जबरदस्ती केली. मुलीनं आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी अॅसिड टाकण्याची धमकी दिली.
आजमगड, उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशच्या आजमगडमध्ये क्रौर्याची सर्व मर्यादा ओलांडली गेलीय. येथे, एका आठ वर्षाच्या निरागस मुलीवर युवककानं घृणास्पद कृत्य केलं. आरोपी युवकाला आता अटक करण्यात आली आहे, परंतु या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे. असा आरोप केला जात आहे की, जेव्हा ही निरागस मुलगी राहत असलेल्या परिसरात खेळत होती तेव्हा त्या युवकानं तिला फूस लावून त्याच्यासोबत नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. अल्पवयीन मुलीनं घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला असता हा प्रकार उघडकीस आला.
खरगोन, मध्य प्रदेश
मध्य प्रदेशातील खरगोन येथे शेताची देखभाल करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केलाय. आरोपींनी पीडितेच्या भावाला काठीनं मारहाण करत जखमी केलं आणि त्यानंतर पीडितेवर बलात्कार केला. सध्या या प्रकरणातील तिन्ही आरोपी फरार आहेत, पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला आहे. खरगोनमधील झिरन्या पोलिस स्टेशन परिसरातील मारुगढ गावची ही घटना आहे, ही युवती केवळ १६ वर्षाची होती.
सवाई माधोपूर, राजस्थान
राजस्थानच्या सवाई माधोपुरात अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना उघडकीस आलीय. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केलीय. परंतु अद्याप संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे, या संपूर्ण प्रकरणात काही स्थानिक नेत्यांचीही नावं असल्याचं सांगण्यात येत आहे.
बारां, राजस्थान
राजस्थानच्या बारांमध्ये दोन युवतींनी दोन तरुणांवर बलात्काराचा आरोप केलाय. मुलींच्या वतीनं असा आरोप केला जात आहे की, तरुणांनी त्यांना दम देऊन वेगवेगळ्या शहरात नेलं व बलात्कार करत राहिले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, परंतु पोलिसांच्या सांगण्यावरून या प्रकरणाला वेगळे वळण मिळतंय. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला पोलिस स्टेशनमधून जाण्यास परवानगी दिलीय. पोलिसांचं म्हणणे आहे की, दंडाधिकाऱ्यांसमोर दिलेल्या निवेदनात युवतींनी सहमतीनं तरुणांसोबत जाण्याचं मान्य केलं होतं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे