आरोपी सोबत कुटुंबाचं संभाषण झाल्याचा आरोप हाथरस पीडित कुटुंबियांनी फेटाळला

7

हाथरस, ७ ऑक्टोंबर २०२०: हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात दररोज नवे खुलासे आणि दावे केले जात आहेत. एसआयटीच्या तपासणीत असं आढळलं आहे की, पीडित मुलीच्या भावाच्या फोनवर आरोपी संदीपचा मागील ६ महिन्यांत १०४ वेळा फोन झाला होता. पीडितेच्या कुटूंबानं या खुलाशावर स्पष्टीकरण दिलं. पीडितेच्या भावानं सांगितलं की, हे सर्व आरोप खोटे आहेत.

पीडितेच्या भावानं सांगितले की, ज्या मोबाईल क्रमांकाविषयी बोललं जात आहे तो आमचा आहे. आम्ही बर्‍याच वर्षांपासून त्याचा वापर करीत आहोत आणि हा नंबर घरीच राहतो. फोन रेकॉर्डच्या आधारे हे सर्व आरोप खोटे असल्याचा दावा त्यांनी केला. या संदर्भात आम्ही एसआयटीसमोर उत्तर देऊ.

पीडितेच्या भावानं सांगितलं की, मी (आरोपी) त्याच्याशी का बोलू? तो आमच्या जातीचा नाही. आमचे नातेवाईक नाहीत. आम्ही का बोलू? आम्ही बोललो नाही. त्याचवेळी वडिलांनी सांगितलं की, आमच्या कुटुंबातील कोणीही आरोपींशी फोनवर बोलले नाही. फोन नंबर आमचाच आहे. परंतु याबाबत रेकॉर्डिंग दाखवा तरच काय सत्य आहे ते समोर येईल. तर पीडितेचा दुसरा भाऊ म्हणाला की आमच्या पूर्ण कुटुंबात एकच फोन नंबर आहे.

एसआयटी तपासणीचा कालावधी १० दिवसांपर्यंत वाढवला असता कुटुंबाला याबाबत विचारलं तर कुटुंब म्हणालं की, याबाबत आम्हाला कोणतीही माहिती नाही, तसंच एसआयटी बाबत आम्हाला काहीही घेणं देणं नाही. आम्हाला न्याय मिळायला हवा आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी सीबीआय’ला सोपवण्यात येईल असं म्हटलं जात असताना कुटुंबानं सीबीआय’कडं हे प्रकरण वर्ग करण्याबाबत नकार दिला होता. त्यांचं असं म्हणणं होतं की, या प्रकरणाची चौकशी न्यायालयीन पद्धतीनंच व्हायला हवी. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी गृहसचिव भगवान स्वरूप यांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय एसआयटी करीत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा