पोलिसांच्या मनमानीत हाथरस पीडितेचा झाला अंतिम संस्कार, कुटुंबियांना भेटू दिलं नाही

हाथरस, ३० सप्टेंबर २०२०: हाथरस मधील मुलीसोबत जी अमानुष घटना घडली त्यानं देश पुन्हा हादरलाय. निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी होऊन देखील नराधमांना कायद्याची भीती राहिलेली नाही. आपल्या मुलीसोबत झालेल्या सामूहिक बलात्कार आणि मृत्यू यामुळं परिवारावर देखील दुःखांचा डोंगर कोसळलाय. अशात आणखी एक प्रकार घडलाय ज्यामुळं त्यांच्या जखमांवर आणखी मीठ चोळले गेलं. यूपी पोलिसांनी परस्पर काल रात्री पीडितेचे अंत्य संस्कार केले. कुटुंबातील सदस्य वारंवार पोलिसांना विनंती करत होते पण पोलिसांनी कुटुंबाकडं दुर्लक्ष करत मुलीचे अंतिम दर्शन घेण्यास नकार दिला.

या प्रकरणात युपी पोलिसांवर देखील आरोप ठेवण्यात येत आहे. विशेष म्हणजे काल परस्पर या पीडितेचा अंत्यसंस्कार केल्यामुळं कुटुंबामध्ये आणखीनच आक्रोश वाढलाय. पीडितेचे कुटुंब दहा ते पंधरा मिनिटे पोलिसांना सतत विनंती करत राहिले की, आमच्या मुलीचं शेवटचे दर्शन घेऊ द्या. मात्र, आधीपासूनच आरोपाच्या भोव-यात अडकलेल्या युपी पोलिसांनी असं करण्यास नकार दिला व आपल्या मर्जीप्रमाणं अंत्यसंस्कार करून मोकळे झाले.

 

पीडितेसोबत हे पाशवी कृत्य घडल्यानंतर तिला दिल्ली येथील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी परस्पर तिचा मृतदेह हाथरस येथे नेला. पोलीस तिचा मृतदेह घेऊन हाथरस मध्ये रात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी पोहचले. मृतदेह घेऊन पोलीस गावात पोहोचतात गावातील नागरिक संतप्त झाले होते. कारण, रुग्णालयातून मृतदेह बाहेर काढताना कोणताही पोस्टमॉर्टम रिपोर्ट पीडितेच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला नव्हता किंवा दाखवण्यात आला नव्हता. यावेळी कुटुंबियांनी रुग्णालयासमोर आंदोलन देखील केलं होतं तसंच असं सांगितलं होतं की, जोपर्यंत पोस्टमार्टम रिपोर्ट दिला जात नाही तोपर्यंत पीडितेचा मृतदेह स्विकारला जाणार नाही. ऍम्ब्युलन्स रोखण्यासाठी गावकरी रोडवर झोपले देखील होते. यामध्ये गावातील सर्वच पुरुष व महिला सहभागी झाले होते.

कुटुंबीयांची केवळ एवढी इच्छा होती की, त्यांच्या मुलीचा अंत्यसंस्कार त्यांच्या हातून व तसेच काही वेळासाठी ते आपल्या मुलीला घरी न्यू इच्छित होते. परंतु, त्यांच्या या मागणीला यूपी पोलिसांनी कोणतीही दाद दिली नाही व आपल्या मर्जीने ते पुढील काम करत राहिले. पीडितेच्या आईनं म्हटलं की, “आम्ही आमच्या मुलीला घरी जाऊन तिच्यावर अंत्यसंस्कार करणार होतो. माझ्या मुलीला हळद लावायची होती त्यानंतरच तिला निरोप देणार होतो.” जवळपास दोनशे संख्या असलेले पोलीस या पिढीच्या कुटुंबीयांची मागणी नाकारत राहिले. यानंतर यूपी पोलिस रात्री २ वाजून २० मिनिटांनी पीडितेचा मृतदेह अंतिम संस्कार करण्यासाठी घेऊन गेले. पीडितेचा अंतिम संस्कार होत असताना पोलिसांनी जागेला घेरा घातला होता व कोणालाही पीडितेच्या मृतदेहाजवळ जाऊ दिलं नाही.

जवळपास २५ मिनिटानंतर पोलिसांनी तिच्या चितेला अग्निडाग दिला. पोलिसांनी केलेल्या या कृत्यामुळं गावात सर्वच लोकांमध्ये संताप निर्माण झाला. पण, आता प्रशासन सारवासारव करण्याचा प्रयत्न करतेय. प्रशासनानं असं म्हटलं आहे की, पीडितेच्या कुटुंबीयांच्या सहमतीनेच हा अंतिम संस्कार करण्यात आलाय.

 

काय आहे पूर्ण प्रकरण

हाथरस जिल्ह्यातील चंदपा चौकीच्या गावातील एका १९ वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्कार करण्याची घटना घडली. पीडितेच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, नराधमांनी सकाळी ९.३० दरम्यान पीडीतेसोबत सामूहिक बलात्कार केला व तिला मारहाण केली. या घटनेत चार नराधम सहभागी होते. घटना घडल्यानंतर तब्बल ९ दिवसांनी ही पीडित मुलगी शुद्धीवर आली. शुद्धीत आल्यावर तीने खुणवा- खुणवीतून आपल्यासोबत झालेला प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला.

पीडितेला प्रथम अलिगड मधील एका रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं होतं. तेथं प्रकृती गंभीर झाल्यानंतर तिला दिल्ली येथील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, दुर्दैवानं दिल्लीमध्ये देखील तिचा जीव वाचविण्यात अपयश आलं आणि काल तिचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र दिल्ली पोलीस या प्रकरणातील चार आरोपींना अटक करून आपली पाठ थोपटण्याचा प्रयत्न करत आहे तर योगी सरकारनं तिच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई म्हणून दहा लाखांची मदत जाहीर केलीय.


न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा