हवेली तालुक्यात गुटखा विक्री जोरात

उरुळीकांचन, दि.२२ मे २०२०: सध्या देशासह महाराष्ट्रात कोरोनामुळे लॉकडाऊन लागू आहे. मात्र पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात अवैध गुटखा विक्रीला ऊत आला आहे. एवढंच नाही तर काही गुटखा विक्रेते होलसेलर बनले असून तालुक्यातील खेड्या-पाड्यात गुटखा पुरवण्याचा काम सुरू केलं आहे.

महाराष्ट्र सरकारने गुटखा विक्रीवर बंदी आणली. मात्र ही बंदी कागदावरच असल्याचं दिसून येत आहे. असाच गुटखा व्यवसाय उरुळी कांचन, लोणी काळभोर, हडपसर, कदमवाक वस्ती, या गावा मध्ये जोरात सुरू आहे. पोलीस आणि अन्न प्रशासन विभागाच्या आशीर्वादाने या परिसरात सर्रासपणे गुटखा विक्री सुरु असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

हवेली तालुक्यात होलसेल गुटखा विकला जात आहे. विशेष म्हणजे भरदिवसा दुचाकीवर बॉक्स टाकून बिनधास्त लागेल त्याला माल पुरवला जातो. सध्या कोरोनामुळे पान शॉप बंद असल्याने जीवनावश्यक वस्तूंसाठी किराणा दुकाने चालू आहेत. मात्र संबंधीत दुकानदार आपल्या दुकानातून गुटखा विक्री करत असून खात्याच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांशी विक्रेत्यांचे आर्थिक हितसंबंध असल्याने कारवाई होण्याची चिंता नाही. त्यामुळे गुटखा विक्रेता दिवस-रात्र गुटखा विक्री करत आहे. मोठ्या दुकानांमधूनही परराज्यातून येणाऱ्या अनेक ब्रँडच्या गुटख्याची खुले-आम विक्री होत असून, अन्न व औषध प्रशासनाने याबाबत डोळेझाक करण्याची भूमिका घेत आहे.

राज्यातील ठाकरे सरकारने गुटखाबंदीची कडक अंमलबजावणी व्हावी म्हणून गुटखा विक्री वा साठेबाजीत सहभागी असणाऱ्या आरोपींवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. याबाबतचा कायदा इतका कडक होऊनही त्यांची अंमलबजावणी मात्र संबंधित यंत्रणांकडून होताना दिसून येत नाही. त्यामुळे या सर्वच प्रकारात मिलीभगत असल्याचे खुलेआम आरोप जनतेतून होत आहे.

या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेकडूनच ढिलाई दाखवली जात असल्याने कायदा कडक असूनही जिल्हात अन्य भागांप्रमाणेच हवेली तालुक्यात खुलेआम गुटखा विक्री केली जात आहे. त्यामध्ये विशेष म्हणजे पत्रकारांनी बातमी लावल्यानंतर त्यांची कुठेतरी बदनामी अथवा शिवीगाळ करुन गुटका माफिया खुलेआम फिरत असून यांच्या डोक्यावर कोणाचा वरदहस्त आहे ते पाहणे महत्त्वाचे ठरेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा