लोणी काळभोर: उरुळी कांचन येथील कोरोना बाधित महिलेवर लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू असताना संपर्कात आलेल्या ५१ पैकी एक डॉक्टर व दोन नर्स असे तीन जण कोरोना बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे. डॉ. डी. जे. जाधव यांनी न्यूज अनकट’शी बोलताना सांगितल्या प्रमाणे ५१ पैकी ४८ जणांचे कोरोना चाचणी चे अहवाल बुधवारी (ता. २२) सायंकाळी रुग्णालयाला मिळाले आहेत. ४८ पैकी पंचेचाळीस जण कोरोना निगेटिव्ह आढळून आले आहेत परंतु तीन जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.
दरम्यान, संबधित महिलेच्या संपर्कात आलेले उरुळी कांचन येथील तिचे नातेवाईक, उपचार करणारे डॉक्टर व दुध, भाजीपाला पुरवणारे लोक असे अठरा जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले असले तरी सदर रुग्णालयात संबंधित महिलेवर उपचार करणाऱ्यांपैकी एक डॉक्टर व दोन नर्स असे तीन जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. या घटनेमुळे आता पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यातही कोरोनाचा शिरकाव झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सदर तीन कोरोना बाधितांना पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
न्यूज अनकट -प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे