Hawkers Zone Issue in Pimpri-Chinchwad: पिंपरी-चिंचवड शहरात फेरीवाल्यांच्या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. महापालिका प्रशासनाकडून ‘हॉकर्स झोन’चा तिढा सुटत नसल्याने शहरातील रस्ते, पदपथ नागरिकांसाठी मोकळे होत नाहीत. गेल्या तेरा वर्षांपासून हा प्रश्न ‘जैसे थे’ च आहे. शहरातील फेरीवाले, हातगाडीवाले, टपऱ्या, पथारीवाल्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. मात्र, योग्य नियोजनाच्या अभावामुळे योजनेचे तीनतेरा वाजले आहेत.
सर्वेक्षण पूर्ण; पण अंमलबजावणी शून्य
शहरातील फेरीवाले, हातगाडीवाले, टपऱ्या, पथारीवाल्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, त्यांची यादीही तयार आहे. मात्र, महापालिकेने ठेकेदाराकडून केलेले सर्वेक्षणच बोगस असल्याचा आक्षेप फेरीवाला महासंघाने घेतला आहे. शिवाय, हॉकर्स झोनच्या जागांचा तिढाही अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे बहुतांश फेरीवाले अद्यापही रस्त्यांवर, पदपथांवर थांबून व्यवसाय करत असल्याने वाहतूक कोंडी आणि शहराच्या सौंदर्याला बाधा निर्माण झाली आहे.
वाढती फेरीवाल्यांची संख्या;
गेल्या १३ वर्षांपासून शहरातील हॉकर्स झोनचा तिढा सुटलेला नाही. २०१२ व २०१४ मध्ये हॉकर्सचे सर्वेक्षण करण्यात आले. अनेकांची बायोमेट्रिक तपासणी झाली. काहींना परवानेही मिळाले. मात्र, हॉकर्स झोनची निर्मिती न झाल्याने अंमलबजावणीच झाली नाही. २०२० मध्ये कोरोना संसर्ग वाढला, दोन वर्षाच्या या लाटेत अनेकांचा रोजगार गेला. नोकऱ्या गेल्या. हॉटेल्स, दुकाने बंद पडली. पर्यायाने पोट भरण्यासाठी व कुटुंब चालवण्यासाठी अनेकांनी हातगाड्या, टपऱ्या, पथारी टाकून व्यवसाय सुरू केले. यात भाजीपाला, फळे, गृहोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ, खेळणी विक्रेत्यांची संख्या अधिक आहे. गेल्या चार वर्षात फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे.
भ्रष्टाचाराचा आरोप
सध्या अनधिकृत फेरीवाले, टपरीवाले, पथारीवाल्यांवर कारवाई होत आहे. शिवाय, अनेकजण परस्पर फेरीवाल्यांकडून सर्रास भुईभाडे वसूल करत आहेत. यामुळे शहराला बकालपणा आला आहे. फेरीवाल्यांना दुकानासमोर वा घरासमोर, रस्त्याच्या कडेला वा पदपथावर बसू देण्यासाठी दरमहा दोन ते चार हजार रुपयांपर्यंत भाडे अनेकजण वसूल करतात. मोक्याच्या ठिकाणांनुसार हे भाडे ठरत असते.
महापालिका आयुक्तांचे आश्वासन
शहरात हॉकर्स धोरणाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यासाठी शहरातील सर्व हॉकर्सचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. हॉकर्स झोनची निर्मिती करून त्यांना सुविधा दिल्या जाणार आहेत. हॉकर्सला स्वतंत्र जागा मिळाल्यास रस्ते व पदपथ मोकळे होऊन रहदारी सुरळीत होणार आहे. रस्त्यावरील अनधिकृत टपऱ्या व हातगाड्यांवरील कारवाई थांबणार नाही, असे आश्वासन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे