ज्ञानवापी संदर्भात मुस्लिम पक्षातर्फे एएसआय सर्वे विरोधात दाखल याचिका हायकोर्टाने फेटाळली

लखनऊ, ३ ऑगस्ट २०२३ : वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद परिसरासंदर्भात अलहाबाद हायकोर्टाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला. हायकोर्टाने परिसरात एएसआयचा सर्वे सुरु ठेवण्याचे निर्देश दिले. मुस्लिम पक्षाने या सर्वे विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर ज्ञानवापी मशीद परिसरात तात्काळ सर्वे सुरु होईल. आता हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात मुस्लिम पक्षकार सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे.

न्यायालयाने सर्वेला मंजुरी दिली आहे. एएसआयने आपले प्रतिज्ञापत्र दिले आहे. न्यायालयाचा आदेश आला आहे. त्यामुळे आता काही प्रश्न उरला नाही. न्यायालयाने मुस्लिम पक्षकारांची बाजू फेटाळून लावली आहे, असे हिन्दू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी कोर्टाच्या निर्णयावर सांगितले. हायकोर्टाच्या निर्णयावर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. सर्वेमधून सत्य बाहेर येईल. राम मंदिरासारखा याबाबतही निर्णय होईल.आता सर्व शिवभक्तांची मनोकामना पूर्ण होईल, असे यूपीचे उपमुख्यमंत्री केवश प्रसाद मौर्य म्हणाले.

वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा मागच्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. मशीद परिसरात शिवलिंग असल्याचा दावा केला जात आहे. २०२१ सालामध्ये न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. यात श्रृंगार गौरी स्थळाच्या ठिकाणी पूजा करण्याची परवानगी मागण्यात आली होती. हा विषय सत्र न्यायालयातून हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला. महिलांनी याचिका केल्यानंतर सत्र न्यायालयाने मशीद परिसरात सर्वे करण्याचा आदेश दिला होता. मागच्यावर्षी हिन्दू पक्षाने दावा केला होता की, मशिदीत जेथे तलाव आहे, तेथे शिवलिंग आहे.

स्थानिक कोर्टाच्या आदेशाने मशीद परिसरात एएसआयचा सर्वे सुरु झाला, तेव्हा मुस्लिम पक्षाने विरोध केला. मुस्लिम पक्षाने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने त्यांना हायकोर्टात जायला सांगितले. हायकोर्टात यावर सुनावणी झाली. ३ ऑगस्टसाठी निर्णय राखून ठेवण्यात आला होता. हायकोर्टाने सर्वे सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. यामुळे मशीद परिसरात काही नुकसान होऊ नये, हे सुद्धा सुनिश्चित करण्यास न्यायालयाने सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा