ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर करा, हायकोर्टाचे पालिकेला आदेश

मुंबई, १३ ऑक्टोबर २०२२: शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. उद्या ११ वाजेपर्यंत लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने मंजूर केला नव्हता. त्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाने हायकोर्टात धाव घेतली होती.

रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभेची जागा रिक्त झाली होती. यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. पण ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेच्या कर्मचारी होत्या, त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी नोकरीचा राजीनामा दिला होता. पण तो मंजूर होत नव्हता.

दरम्यान, ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर कोणताही निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची १४ ऑक्टोबर शेवटची तारीख असल्याने लटके यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.

न्यायमूर्ती जमादार यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. यावेळी दोन्ही महापालिका प्रशासनाचे वकील आणि ऋतुजा लटके यांच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तीवाद झाला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर महापालिका प्रशासन तथा संबंधित अधिकाऱ्यांना राजीनामा मंजूर करण्याचे आदेश दिले. उद्या ११ वाजेपर्यंत राजीनामा स्वीकारल्याचे पत्र देण्याचे आदेश दिले आहेत.

कोर्टाच्या या निर्णयानंतर ऋतुजा लटके यांची प्रतिक्रिया…

ऋतुजा लटके म्हणाल्या की, न्याय देवतेकडून मला न्याय मिळाला आहे. माझा न्यायदेवतेवर पुर्णपणे विश्वास होता. त्यामुळे मी कोर्टात धाव घेतली होती. आज सुनावणी झाली. त्याप्रमाणे मला न्याय देवतेकडून न्याय मिळाला आहे. जसे माझे मिस्टर रमेश लटके यांनी जे कार्य केलेलं आहे. त्याचा जो वारसा आहे तो पुढे घेऊन जाणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा