१६ फेब्रुवारी २०२५ : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा हंगाम अवघ्या काहीच दिवसात सुरू होणार असून त्यासाठी भारतीय टीम नुकतीच दुबईला रवाना झाली आहे. टीम इंडियाचा अनुभवी आणि स्टार गोलंदाज जसप्रीत बूमराह दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीतुन बाहेर असणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघात फक्त ३ वेगवान गोलंदाजांना स्थान दिले असुन ५ फिरकी गोलंदाजांसह टीम इंडिया दुबईला रवाना झाली आहे. यातच भारतीय संघाचा माजी क्रिकेटर आणि गोलंदाज रविचंद्रन अश्विनने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी टीम इंडियाच्या संघावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
अलीकडे आश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनल वर याबाबत निराशा व्यक्त केली आहे. निवडकर्त्यांनी संघ निवडताना चूक केली आहे असे त्याने म्हंटले आहे. भारतीय संघात २ अतिरिक्त फिरकी गोलंदाज आहेत. त्याच वेळी यशस्वी जयस्वालचा राखीव यादीत समावेश केल्याची टीका त्याने केली आहे.
अश्विन म्हणाला की, “आमचे २ डावे गोलंदाज हार्दिक पंड्यासह शानदार अष्टपैलू आहेत. अक्षर आणि जाडेजा खेळातील, हार्दिक आणि कुलदीपही खेळातील. तुम्हाला जर वरुण चक्रवर्तीला खेळवायचे असल्यास एका वेगवान गोलंदाजाला बाहेर बसावे लागेल आणि हार्दिकला वेगवान गोलंदाजाची भूमिका पार पडावी लागेल.” असे आश्विनने म्हटले आहे. २० फेब्रुवारीला भारत आणि बांग्लादेश यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना दुबई येथे खेळवण्यात येणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रथमेश पाटणकर