सोलापूर, दि.२७ मे २०२०: लॉकडाऊनमुळे परराज्यात व परजिल्ह्यामध्ये अडकलेल्या नागरिकांना स्वगृही जाण्यासाठी व येण्यासाठी शासनाने कार्यपध्दती जाहीर केली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अडकलेले नागरिक, विद्यार्थी , मजूर सध्या स्वगृही परत येत आहेत.
शासनाच्या निर्देशानुसार, या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानुसार आतापर्यंत पंढरपूर तालुक्यात स्वगृही परतलेल्या शहरी व ग्रामीण भागातील ५ हजार ३०० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर अडकलेले नागरिक स्वगृही येत आहेत.
परराज्यातून तसेच इतर जिल्ह्यातून तालुक्यात आलेल्या नागरिकांची आरोग्य विभागामार्फत तपासणी करण्यात येत आहे. येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांना आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे.
गृह विलगीकरणात असलेल्या नागरिकांनी विलगीकरणाचे पालन करावे. या नागरिकांवर ग्रामीण भागात ग्रामस्तरीय समिती व शहरी भागात वार्डस्तरीय समिती लक्ष ठेवत आहे. तसेच त्यांच्या आरोग्याची दररोज तपासणी करुन माहिती संकलित करण्यात येत असल्याचेही ढोले यांनी सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी: