मराठा आरक्षण स्थगितीवर आज सुनावणी

9

नवी दिल्ली, २७ ऑक्टोबर २०२०: मराठा आरक्षण प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतरची ही पहिली सुनावणी आहे. ज्या खंडपीठाने आरक्षणाला स्थगिती दिली त्याच तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे आजची सुनावणी होणार आहे. परंतु या खंडपीठासमोरील सुनावणीवर सरकारने आक्षेप नोंदवला आहे. राज्यात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर असणारी नाराजी तसंच आरोप-प्रत्यारोप होत असताना होणाऱ्या या सुनावणीकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

आरक्षणाला स्थगिती देताना हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे देण्यात आलं होतं. परंतु आजची सुनावणी ज्या खंडपीठाने स्थगिती दिली, त्याच नागेश्वर राव यांच्या अध्यक्षते खालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे होत आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सोमवारी यासंबंधी बोलताना ज्या खंडपीठाने स्थगिती दिली त्यांच्यासमोर सुनावणी न होता दुसऱ्या खंडपीठासमोर घेण्यात यावी अशीही विनंती करणार असल्याचं म्हटलं होतं. “मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठासमोर व्हायला हवी ही फक्त सरकारचीच नाही तर सर्व याचिकाकर्त्यांची भूमिका आहे,” असंही अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

सुप्रीम कोर्टाने ९ सप्टेंबरला मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती. तसंच हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्याचाही आदेश दिला होता. या निर्णयामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला. त्यानंतर राज्यात या मुद्द्यावरुन राजकीय वादळ उठलं. त्यानंतर ही स्थगिती उठवण्यासाठी याचिकाकर्ते विनोद पाटील आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या स्थगिती उठवण्याबाबत आज काही निर्णय होतोय का? खंडपीठ यावर काय भूमिका घेतं? हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे