बारामती, दि. २० जून २०२०: बारामती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तक्रारदाराची धावपळ थांबण्यासाठी व झटपट सुविधा उपलब्धतेसाठी बारामतीच्या तहसीलदार कचेरीत होणा-या विविध तक्रारींच्या प्रकरणाची सुनावणी आता प्रत्येक मंडलात सुरु करण्याचा निर्णय बारामतीचे तहसीलदार विजय पाटिल यांनी घेतला आहे. या उपक्रमा बाबत ग्रामस्थांनी देखील स्वागत केले आहे.
या अभिनव उपक्रमाचा तालुक्यातील आठ मंडलातील तक्रारदारांना फायदा होणार आहे. बारामती तहसीलदार कचेरीत दरमहा तालुक्यातील विविध गावातील ग्रामस्थ, शेतकरी यांचा तहसीलदार यांच्याकडे असलेल्या रस्ता, दरखास्त, अतिक्रमण व महसुला अंतर्गत येणा-या विविध तक्रारींवर सुनावणी होत असते. त्यामुळे तक्रारदारास सुनावणी तारखेला बारामती येथे कचेरीत हजर व्हावे लागते.
कोरोनाच्या धर्तीवर गेली अनेक दिवस तहसिल कचेरीत सुनावण्या होऊ शकल्या नाहीत. तहसीलदार कचेरीत गर्दी होऊ नये, गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी तहसीलदार विजय पाटिल यांनी सुनावणीसाठी तालुक्यात एक अभिनव संकल्पना सुरु केली आहे. यापुढे तहसिल कचेरीत होणा-या सुनावण्या तालुक्यातील प्रत्येक मंडलात महिन्यातील ठराविक दिवशी होणार आहे. या अभिनव संकल्पनेची सुरवात पणदरे ( ता.बारामती ) या मंडलात सुरु करण्यात आली आहे.
पणदरे मंडला अंतर्गत येणा-या १८ गावातील विविध तक्रारींची सुनावणी तहसीलदार विजय पाटिल यांनी घेतली. यावेळी मंडलाधिकारी रवी पारधे, तलाठी एल.एस.मुळे, आर.एन.कोल्हे, ए.ए.भगत, डि.एस.तलवार,उज्वला भगत, कोतवाल पांचाली जगताप व तक्रारदार उपस्थित होते.
दरम्यान प्रत्येक मंडलात सुनावणी घेणाचा उपक्रम लोक हिताचा असुन यामुळे तक्रारदाराचा वेळ व पैसा वाचणार आहे अशी माहिती तलाठी एल.एस.मुळे यांनी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव