पुण्यात भंगाराच्या दुकानाला भीषण आग ; हवेत पसरले धुराचे लोट

पुणे, १० जून २०२३: पुण्यातील कर्वेनगर येथील नदीपात्रालागत असलेल्या भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग मोठ्या प्रमाणात पसरत असून आगीने रौद्ररूप धारण केले आहे. परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. दुधाणे लॉन्स या परिसरामध्ये भंगाराची अनेक दुकाने असून येथील सामानाला आग लागली आहे. या ठिकाणी जुने टीव्ही, फ्रिज आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत. या आगीत फ्रिजच्या कॉम्प्रेसरला आग लागल्यामुळे फुटण्याच्या घटना देखील घडत आहेत.

आगीच्या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता, वारजे, कोथरूड, एरंडवणा येथील अग्निशमन दलाचे पंप घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच पीएमआरडीएकडील पाण्याचे टँकर देखील घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या ठिकाणी अनेक अनाधिकृत दुकाने असून येथील भंगार सामानांना आग लागली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा