मुंबई, ठाणे, पालघर आणि नवी मुंबईत जोरदार पाऊस, ठिकठिकाणी साचले पाणी

6

मुंबई २५ जून २०२३: बिपरजॉय चक्रीवादळाच्या परिणामामुळे लांबलेल्या मान्सूनची दमदार सुरुवात झाली आहे. पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण उडाली. पावसाने हजेरी लावताच मुंबईतील नालेसफाईची पोलखोल झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी नालेसफाईची पाहणी केल्यानंतरही पहिल्याच पावसात मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबईची तुंबई झाल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून आले. काल दुपारी सुरू झालेला पाऊस आजही सुरूच आहे. त्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबले तर पावसामुळे मुंबईसह ठाणे, पालघर आणि नवी मुंबईत वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. आजही पाऊस सुरूच असून दिवसभर पाऊस राहणार असल्याचा अंदाज आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यात काल दुपारपासून संततधार पावसाने चांगलाच जोर धरल्याने अनेक भागात पाणी साचले. दादरच्या शिवाजी पार्कमध्येही चांगलेच पाणी साचले होते. मुंबईतील अनेक भागात पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. रेल्वे रुळावरही पाणी आल्याने काल रेल्वेही उशिराने धावत होत्या. तर नवी मुंबईतही काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. काल सुरू झालेला पाऊस रात्रभर सुरू होता. अजूनही मुंबई, ठाणे, पालघर आणि नवी मुंबईत अजूनही दमदार पाऊस सुरू आहे.

पहिल्याच पावसात मीरा-भाईंदर शहर पाण्याखाली गेले आहे. मीरा-भाईंदर शहरातील अनेक सखल भागात पाणीच पाणी झाले आहे. मिरारोड पूर्वेच्या सिल्वर पार्क परिसरातील सुंदर सरोवर कॉम्प्लेक्स मध्ये गुडघ्या इतके पाणी साचले आहे. मिरारोडच्या शीतल नगरमध्ये रस्त्यांवर पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. तसेच शहरात इतर ठिकाणीही पाणी साचलेले आहे. पहिल्या पावसाने मिरा भाईंदर पालिका प्रशासनाचा शंभर टक्के नालेसफाईचा दावा फोल ठरल्याचे दिसून येत आहे.

बोरिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरात पाणी तुंबले आहे. त्यामुळे लोकांना पाण्यातून चालावे लागत आहे, वाहनांचे टायर पाण्यात बुडालेले दिसत आहेत. रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. आणखी पाऊस झाल्यास आजूबाजूच्या दुकानांमध्येही पाणी तुंबणार असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर अंधेरी आणि दहिसर भागातील अंडरपास रोड वरती पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा