पुणे, १५ ऑक्टोंबर २०२०: हवामान खात्यानं १३ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर या दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. परिणामी गेल्या दोन दिवसात राज्यामध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे. यंदा सरासरीपेक्षा पावसाचं प्रमाण देखील जास्त होतं, त्यामुळं या आधीच्या काळामध्ये देखील शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. त्यात या तीन ते चार दिवसातील पावसामुळं शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास देखील पावसानं हिरावून घेतला आहे.
मराठवाड्यात यंदा नेहमीच्या सरासरीपेक्षा खूपच जास्त प्रमाणात पाऊस कोसळला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत शेतकऱ्यांना व्यवस्थित पीक घेता आले नव्हते. यानंतरही शेतकऱ्यांनी उमेद न हारता दुबार-तिबार पेरणी गेली होती. पिकांनी तग धरल्यामुळे या मेहनतीचे चीजही होताना दिसत होते. मात्र, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची ही सर्व मेहनत पाण्यात घालवली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात पावसांनंतर पुराचा हाहा:कार समोर आला असून दोन पाझर तलाव फुटले आहेत. लोहारा तालुक्यातील मुरशदपूर येथील पाझर तलाव फुटल्यानं पिकांचं नुकसान झालं. तर परंडा तालुक्यातील लोहारा वाघेगव्हाण पाझर तलाव फुटला. पुरात व पाण्यात अडकलेल्या ८४ नागरिकांना प्रशासनानं सुरक्षित स्थळी हलविले.
तर दुसरीकडं मागच्या पंधरा दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये अधूनमधून येणाऱ्या पावसानं खरीप पिकाचं मोठं नुकसान केलं आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन काढले आहे. खरिपाच्या पिकांची काढणी झाली आहे. मात्र, बीड जिल्ह्यात सर्वाधिक पेरा असलेल्या कपाशीचे मात्र या पावसामुळं नुकसान होताना पाहायला मिळत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे