जालना, २६ जानेवारी २०२४ : ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जालन्यातील अंबड तालुक्यातील सुखापुरी येथील भुऱ्या उर्फ कार्तिक वजीरचा लोकशाही वरची नवी व्याख्या सांगत त्याच्या भाषणाचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत आहे. भुऱ्या सांगतो की, ‘या लोकशाहीत काही पण होऊ शकत, माझ्या वर्गात मॉनिटर निवडायचा होता, सगळे पोरं म्हणाली भुऱ्या उभा राहा, आम्ही तुला मतदान करू, आम्ही तुझा प्रचार करू, असं म्हटल्याने मी निवडणुकीसाठी उभा राहिलो, दिवसभर माझ्याकडून बिस्कीटचे पुडे खाल्ले, चॉकलेट खाल्ले, मला वाटलं आता मीच निवडून येणारं, दुसऱ्या दिवशी मतदान होतं. पोरं सकाळीच माझ्या घरी आली, म्हणाली भुऱ्या आज मतदान आहे अंडी खाऊ घाल, माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी दुसऱ्याच्या पोल्ट्री मधील अंडी चोरली आणि मित्रांना खाऊ घातली, मतदान झाले, आणि मला फक्त चारच मत पडली, माझ्या वर्गातील दुसरीच पोरगी मॉनिटर झाली. तेव्हापासून मी कानाला खडा लावला की, आता निवडणुकीत उभ राहीच नाही, अन् समोर पोरगी असेल तर बिलकुल नाही. म्हणून तुम्हाला सांगतो कार्यकर्त्यांवर विश्वास ठेऊ नका, इथून पुढे इलेक्शनला फक्त मतदान करायचं. कुणाचं खायचं प्यायच बिलकुल नाही. मी जसं करायचो तसचं पोरांनी माझ्याबरोबर केला. एवढं बोलून थांबतो. मला दुसऱ्या पोराचं प्रचार करायला जायचं आहे.’ असं आपल्या जीवनातील एक प्रसंग सांगत मतदानावेळी कुठलीही अपेक्षा न ठेवता योग्य उमेदवाराला निवडून द्यावे असा संदेश लहानग्या भूऱ्याने आपल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त केलेल्या भाषणातून दिला आहे. त्याचा हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत आहे.
आज पुन्हा लोकशाही वर भाषण केलेल्या भूऱ्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. लोकशाही म्हणजे काय? आणि त्याच्या जीवनात त्याला क्षणोक्षणी लोकशाही कामी येते हे ठामपणे सांगताना हा चिमुकला त्याला लोकशाही खूप आवडते असे गेल्या वेळी सांगितले होते. त्यावेळी सांगताना मी खूप दंगा मस्त्या करतो, पण माझे बाबा मला रागवत नाही कारण त्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे असं म्हटल्याने त्याचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता.
मूळचा जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेवलगाव इथे दुसऱ्या इयत्तेत शिकणारा हा कार्तिक जालिंदर वजीर नावाचा चिमुकला आहे. त्याचे वडील शेती करतात. मुळातच खोडकर प्रवृत्तीचा कार्तिक दिसायला खूपच गोरापान असल्याने मित्र त्याला गमतीने भुऱ्या म्हणतात. पण व्रात्य, खोडकर आणि आपल्या मधुर वाणीने सगळ्यांना आपलंसं करणाऱ्या कार्तिकला रातआंधळेपणाचा आजार जडलेला आहे. त्यांची दृष्टी कमी झाल्याने त्याला वर्गात फळ्याच्या समोरच बसव लागतं. मागे बसलेल्या कार्तिकला फळ्यावरचं काहीच वाचता येत नाही म्हणून शिक्षक भारत म्हस्के यांनी कर्तिकची चौकशी केली आणि कर्तिकच्या निष्पाप हसऱ्या चेहऱ्या मागचं दुःख उजेडात आलं. तेंव्हापासून सर त्याला फळ्यासमोरच बसवू लागले.
कार्तिक मुळात हुशार, पहिल्या इयत्तेत असताना त्याचे सगळे पाढे पाठ होते. तो कब्बडी पण छान खेळतो. शाळेत विविध स्पर्धा होतात, मुल भाषण ठोकतात मग मी का बोलू नये? म्हणून कार्तिक आग्रही होता. हे एवढंस् पोरगं काय बोलेल? म्हणून सरांनी त्याला लोकशाहीवर बोलायला सांगितलं. त्याला त्याबद्दल काही पाठ करायला पण दिलं. त्याला समजेल की नाही म्हणून त्याच्याच वर्गात असलेल्या त्याच्या मोठ्या बहिणीला याची तयारी करून घे म्हणून सांगितलं. त्याने सगळ भाषण पाठ केलं आणि स्टेजवर उभा राहून तो जे काही बोलला त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.
मुळात हुशार, चुणचुणीत असणाऱ्या कार्तिकला उपचाराची गरज होती. भुऱ्याचा व्हायरल व्हिडिओ थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे ओ एस डी मंगेश चिवटे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यावर भुऱ्यावर डॉ. तात्याराव लहाने यांच्या मार्गदर्शन खाली उपचार सुरू झाले. त्यामुळे भुऱ्याच्या दृष्टीत थोडाफार फरक पडला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी