मुंबई, २४ सप्टेंबर २०२० : राज्यात बहुतांश भागात आज मुसळधार पावसानं हजेरी लावली. मुंबईत जोरदार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. शहरातल्या अनेक सखल भागात पाणी साचलं. मुंबई शहर आणि उपनगरात गेल्या चोवीस तासात अतिवृष्टीची नोंद झाली. मुंबई शहर परिसरात २६७ मिलीमीटर, पूर्व उपनगरात १७१ मिलीमीटर आणि पश्चिम उपनगरात २५१ मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली. कुलाबा इथं १३८ मिलिमीटर तर सांताक्रुझ इथं १२६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
दरम्यान मुंबईत आग्रीपाडा इथं दोन सुरक्षा रक्षकांचा पाण्यात अडकलेल्या लिफ्टमध्ये बुडून मृत्यू झाला. नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केलं होतं. त्यानुसार मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर बहुतांश कार्यालयं आणि आस्थापना आज बंद होत्या.
मुसळधार पावसाचा मुंबई आणि उपनगरी रेल्वेसेवरही परिणाम झाला. चर्चगेट ते वांद्रे दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं या स्थानकांदरम्यान रेल्वे सेवा ठप्प झाली होती. आता धीम्या मार्गावरून पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्ववत सुरु झाली असल्याचं पश्चिम रेल्वेनं कळवलं आहे. मध्य रेल्वे मार्गावरही रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशीदरम्यान रेल्वेसेवा ठप्प झाली आहे.
दरम्यान पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी एनडीआरएफच्या पाच तुकड्या तैनात ठेवल्या असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवर यांनी दिली. ठाणे तसंच पालघर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. ठाणे शहरात संध्याकाळी पावसाचा जोर वाढला असून, मागच्या तासभरात २८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
रत्नागिरी जिल्ह्यात आज सायंकाळी जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडला. किनारपट्टीवर वाऱ्यांचा जोर अधिक असल्यानं मच्छीमारांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. आज रात्रीपर्यंत पावसाला जोर असेल. त्यानंतरचे दोन दिवस पावसाचं प्रमाण कमी असेल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे
नाशिक शहरासह जिल्ह्यात काही भागात आज दिवसभर जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात देवळा, दिंडोरी, चांदवड, येवला, मालेगाव आणि कळवण येथे पावसाने चांगली हजेरी लावली. निफाड मधील नांदुरमध्यमेश्वर धरणातून २० हजार ६५७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
बुलडाणा जिल्ह्यात गेले दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे शेतजमीनी खरडून गेल्यानं, पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यात अहमदनगर, सातारा, गडचिरोली, भंडारा, धुळे, रायगड, जिल्ह्यातही जोरदार पाऊस होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी